पान:केसरीवरील खटला.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लोहोगांव येथे घडलेली हकीकत

४३

उरल्या तीन सोजिरांमागें जाऊं लागले, व्हाइट यानें सांगितल्यावरून असो किंवा स्वतः तोच बावरल्यामुळे असो, असें पळून जाणें मूर्खपणाचें होतें व पुढील तंटा यामुळेच झाला. गांवकरी शार्मनला पकडीत, पण तो फिरून त्यांना झुकांडी देऊन पळून जाई, असें बरेच वेळां झालें. तो स्वस्थ राहता तर कांहींच वाईट घडले नसतें.

 इकडे या तिघां सोजिरांच्या मागे लागलेले लोक ( हे सुमारें १०/१२ असावेत ) त्यांना ‘तुमचीं नांवें व पत्ते टिपून द्या' असें म्हणत होते. होतां होतां सोजीर एकदांचे थांबले, पण त्यांचेजवळ कागद व पेन्सिल नव्हती. तेव्हां एक गांवकरी म्हणाला, 'मी गांवांत जाऊन कागद-पेन्सिल आणतों व त्याबरोबर पाटील व तलाठी यांनाहि घेऊन येतों', असे म्हणून तो गेला. या सुमारास आरोपी वॉकर यानें मागून येणारे लोकांच्या डोक्यावरून हवेंत एक गोळी झाडली. हे कृत्य अर्थात् मूर्खपणाचें होतें, कारण त्यामुळे गांवकरी अधिक रागावले. व नांवें दिल्याशिवाय आम्ही तुम्हांस जाऊं देत नाहीं असें म्हणूं लागले, एका गांवकऱ्याने एक दगडहि फेंकला, पण तो कोणास लागला नाहीं. तथापि या गांवकऱ्यांची वागणूक एकंदरीने भांड खोर किंवा धमकीची नव्हती, फक्त सोजिरांचीं नांवें व पत्ते टिपून घेऊं येवढाच त्यांचा निश्चय होता. कागद-पेन्सिल आणण्याला गेलेला गांवकरी परत येण्यापूर्वी, नारायण माघारा येऊन या गांवकऱ्यांना सांगू लागला कीं, शार्मनला पकडून जवळच्या एका झोंपडींत ठेवलेला आहे. तेव्हां उरलेले तिघे सोजीर व हे लोक झोंपडीकडे जाऊ लागले. पण एकदोन झोंपड्यांत शार्मन न भेटल्यामुळे, हे लोक आपणांला फसवून कांहींतरी संकटांत घालीत आहेत असे वाटून, हे तिघे सोजीर बराकीकडे जाण्याकरितां निघाले. इतक्यांत पाटील व तलाठी येत असलेले दिसूं लागले. तेव्हां गांवकरी त्यांना समजावून सांगू लागले कीं, थोडे थांबा, जाऊं नका. सोजीर न ऐकतां जबरदस्तीनें जाऊं लागले, तेव्हां लोक त्यांना दंडाला किंवा बाह्यांना धरून थांबवूं लागले. या सुमारास आरोपी वॉकर हा मागें वळला, त्याबरोबर त्याच्या कंबरेशी असलेली परंतु त्यानें दोनहि हातांनीं धरलेली रायफल बंदूकहि मागें फिरली व गोळी उडाली; ती एका गांवकऱ्याला लागून तो खाली पडला व पुण्यास नेत असतां वाटेंत सुमारें