पान:केसरीवरील खटला.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३७

न्या. मार्टेन यांचा निकाल

म्हणजे काय हें सांगितले पाहिजे. 'कोर्टाची बेअदबी' हा व्यक्तिश: कोणा जज्जाच्या मानापानाचा प्रश्न नाहीं. हा जनतेच्या संरक्षणाचा प्रश्न आहे, असें इंग्लिश खटल्यांत दर्शविलेले आहे. कोर्टाच्या बेअदबीचे दोन प्रकार असतात. कजा चालू असतां त्यावर टीका करून न्यायाचे कामांत अडथळा करणें हा पहिला होय, व निकालानंतर जजांच्यावर भलते आरोप करणें हा दुसरा प्रकार होय. प्रस्तुतच्या खटल्यांत पहिला प्रकार घडला नसून दुसऱ्या प्रकाराचाच विचार करावयाचा आहे.

 खटल्याच्या निकालावर प्रामाणिक टीका करावयाला कोणाला हि अधिकार आहे; मग तो वृत्तपत्रकार असो वा नसो. मात्र यांत सामान्य व्यक्तींना जेवढा अधिकार आहे त्याहून पत्रकर्त्यांना अधिक सवलत नसते हें २३ मुंबई (पिक्थॉल यांचा खटला) यांत जस्टिस कंप यांनीं दाखविले आहे.

 प्रतिवादीचें म्हणणें असें आहे की, आक्षिप्त लेखावरून फार तर जजांचा आरोपीच्या बाजूला न कळत कल झाला असेल असे म्हणतां येईल. यासंबंधांत २४ मुंबई - पृष्ठ ९२८ यांत सगळ्या आवारांचा विचार करून निष्कर्ष काढला आहे. ३३ मुंबई - पृष्ठ २४० हा आधार त्यासच पुष्टि देतो. आक्षिप्त लेखांत "युरोपिअनांच्या विरुद्ध चालणारे खटले हे ‘फार्स' आहेत; हा मायावीपणा आहे, जज्जांनीं दिवसाढवळ्या तर्कशास्त्राचा खून केला; तराजूचें एक पारडें गोरें व एक काळे असले म्हणजे गोरें पारडे जड ठरून खाली बसतें, यांत नवल तें काय ? " अशीं विधानें आहेत. त्यानंतर 'खोट्या मापा'नें न्याय दिला जातो असें म्हणून "लोहगांवास स्तंभ उभारून त्यावर या खटल्याची हकीकत कोरून ठेवावी, म्हणजे ब्रिटिश राज्यांत हिंदी प्रजेच्या जिवाची किंमत किती मानली जाते आणि न्याय किती निःपक्षपातानें दिला जातो हे समजेल " असेंहि म्हटले आहे.

 आपल्या प्रतिज्ञापत्रकांत व बचावाच्या भाषणांत प्रतिवादी प्रतिज्ञेवर असें सांगतो कीं, “हायकोर्टजजावर जाणूनबुजून पक्षपात केल्याचा आरोप करण्याचा आपला उद्देश नव्हता; तराजूचीं पारडीं समतोल राखण्याचा न्यायमूर्तींनी प्रयत्न केला; परंतु सेशन्स कोर्टात ज्यूरीनें आरोपीस अनुकूल निकाल देऊन त्याचें पारडें आधीच जड करून ठेवले असल्यानें हायकोर्