पान:केसरीवरील खटला.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
केसरीवरील खटला

जागचे जागींच एकमेकांचा सल्ला घेऊन प्रथम न्या. मार्टेन यांनीं व नंतर न्या. किंकेड यांनी आपआपले निकाल तोंडाने सांगितले व ते सरकारी शार्टहँड रिपोर्टरानें उतरून घेतले. निकाल सांगतांना केळकर स्वतः कोर्टा- तच बसले असल्याकारणाने त्यांना उद्देशून असे कोर्टानें वेगळें कांहीं भाषण केले नाहीं. निकाल सांगत असतां, शिक्षा सांगण्यास सुरुवात झाली तेव्हां सर्व कोर्टात इतकी एकाग्रता झाली होती कीं, टांचणी खाली पडती तरी ऐकू येती; व शिक्षा सांगून पुरी होतांच एकदम गर्दी मोडण्याला सुरुवात झाली व लोकांच्या जाण्याचा गोंगाट इतका होऊं लागला कीं, पुढें न्या. किंकेड हे आपला निकाल तोंडानें सांगू लागले तो ऐकूं जाण्याचीहि मुष्कील पडली !

 न्या. मार्टेन व न्या. किंकेड यांचे निकाल पुढे दिले आहेत. दोनहि निकालांत शब्दयोजना किंचित् वेगवेगळी असली तरी पांच हजार रुपये दंड व दोनशे रुपये कोर्टखर्च अशी शिक्षा देण्यासंबंधानें उभयतांचें एकमतच होतें. दंडाची रक्कम दुसऱ्याच दिवशी सकाळीं भरण्यात आली.

न्या. मार्टेन यांचा निकाल

 जस्टिस मार्टेन यांनी कोर्टाचा निकाल सांगतांना प्रथम मूळ खटल्याची थोडक्यांत हकीकत सांगितली. नंतर ज्यूरीनें आरोपी ‘निर्दोषी', असा निकाल दिला तरी सेशन्स जज्जाला आरोपीकडून पि.को. कलम ३०४ अ-प्रमाणे अविचाराचें व निष्काळजीपणाचं कृत्य घडले असे वाटून त्यांनीं हाय- कोर्टाकडे खटला धाडला. त्यावर चीफ जस्टिस यांनी तीन प्रकारांपैकी मुद्दाम नेम धरून गोळी झाडणें, किंवा गांवकऱ्यांना भिवविण्याकरितां कशीतरी हवेंत बंदूक उडविणें, या दोनहि गोष्टी असंभवनीय वाटतात असा अभिप्राय देऊन, ज्याअर्थी अमुकच एक प्रकार घडल्याचें पुराव्या- वरून सिद्ध होत नाहीं; त्याअर्थी ज्यूरीनें दिलेला निकाल आम्ही मान्य करतों व आरोपीस दोषमुक्त करतों असा निकाल दिला असे सांगितलें, नंतर जस्टिस मार्टेन म्हणाले – अपेलेट कोर्टाचा निकाल बरोबर आहे कीं चुकीचा आहे हे पाहणें आपले काम नाहीं. केसरींतील लेखानें कोट - वर अप्रामाणिकपणाचा अथवा लांचलुचपतीचा आरोप केला की काय एवढेच पाहावयाचें आहे. त्याचा विचार करण्यापूर्वी 'कोर्टाची बेअदबी'