पान:केसरीवरील खटला.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सरकारी वकीलाचें उत्तर

३५

ठरवून द्याल ती मी आनंदानें सोशीन, कारण जन्मभर जें काम मीं खुषीनें पत्करलें व केलें-म्हणजे लोकमत दिसतें तें माझ्या बुद्धीप्रमाणें वर्तमानपत्रे वगैरेंतून प्रगट करणें तें करण्याच्या अनुषंगांत अशा तऱ्हेची जोखीम असणारच हे मला पूर्णपणे माहीत आहे. तथापि ही गोष्ट देखील कोर्टाचा अधिकार जुमानूं नये, किंवा घडलेल्या कृत्यांत पुनः आग्रहानें भर टाकावी, या बुद्धीनें केली नाहीं. न्यायकोर्टाचा अधिकार व कर्तव्य ह्रीं दोनहि उच्च दर्जाचीं असल्यानें त्यांना लोकांनी योग्य तो मान दिला पाहिजे हें मी जाणतों. परंतु लोकमतप्रदर्शक वर्तमानपत्रकार या नात्याने मला ही टीका करावी लागली, व या नात्यानें वर्तमानपत्रकारालाहि कांहीं विशेष हक्क असतात ते न्यायपीठापुढें व जनतेपुढे यावे एवढाच माझ्या वरील भाषणांतील मुख्य हेतु आहे.

सरकारी वकीलाचें उत्तर

 अशा रीतीनें केळकर यांचे भाषण अडीच वाजण्याचे आधीं कांहीं थोडा वेळ संपलें, ते खालीं बसल्यावर सरकारी वकील पाटकर हे उठून म्हणाले, " मीं नेमकीं आक्षित वाक्यें काढून दाखविलीं नाहींत असे केळकर म्हणाले, पण तशीं दाखविलीं असतीं तर तेच उलट म्हणाले असते, 'तुटक वाक्य घेऊन काय उपयोग? सर्व लेख घेतला पाहिजे.' केळकरांचे बाजूला झुकता कांटा कितीहि दिला तरी त्यांच्या लेखांत कोटीची बेअदबी व्हावी असा अर्थ निघाल्याशिवाय रहातच नाहीं. न जाणत्या पक्षपाताचा आरोप स्वतः त्यांनींच कबूल केला आहे. पण न जाणता पक्षपात याचा अर्थ 'न्याय बरोबर न देतां येण्यासारखें विकृत मन'. पण केवळ अजाणत्या पक्षपाताचा आरोप येथें नाहीं, जाणत्या पक्षपाताचा आरोप येथे आहे, असे मी म्हणतों. या खटल्यांतल्या न्यायाधीशांना जज्ज व ज्यूरी या दोघांचेहि अधिकार आहेत असे केळकर म्हणाले, व त्याप्रमाणें मीहि म्हणतों. बेअदबीचा अर्थ केळकरांच्या लेखांतून निघतो कीं नाहीं, व निघाला तर तो गुन्हा आहे कीं नाहीं, हें कोर्टानेंच ठरवावें.”

 इतके झाल्यावर या खटल्याच्या सुनावणीचे काम संपले. नंतर 'विनोद' पत्रावरील खटल्याची सुनावणी सुरू झाली व ती मधल्या सुटीनंतर सुमारें 'साडेचारच्या सुमाराला संपली. त्यानंतर न्या. माटेन व किंकेड यांनी