पान:केसरीवरील खटला.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८
केसरीवरील खटला

लिहिणें हें माझें कर्तव्य होतें. हायकोर्टाने दिलेला निकाल अगदी चूक असें मला नुसतें तेव्हांच वाटत होतें असें नाहीं तर आतां त्याहीपेक्षां अधिक पक्के वाटते. हे सर्व असे असतां मीं अजाणत्या पक्षपाताचा आरोप न्याय- मूर्तीवर केला यांत माझ्या हातून अप्रामाणिकपणा तो काय झाला ? कोर्टाची बेअदबी ही जवळजवळ खासगी व्यक्तीच्या बेअदबीसारखीच समजली पाहिजे. एक खासगी व्यक्ति व दुसरा सरकारी अधिकारी असें असले तरी बेअदबी किंवा बेअब्रू यांच्या गुन्ह्याच्या कायद्याचें शास्त्र जवळ- जवळ एकच असणार. खासगी बेअब्रूत विलायतेंत ज्यूरीनें निकाल कराव- याचा असतो, व कोर्टाच्या वेअदबींत तिकडे व इकडे कोर्ट सर्वाधिकारसंपन्न आहे. विलायतंत ज्यूरीचे बारा लोक हा आरोपी व सरकार यांचे दरम्यान संरक्षणाचा एक प्रकारचा बुरूज असतो. इकडे आम्हाला मात्र तसा बुरूज नाहीं. त्यांतून कोर्टाच्या बेअदबीचा सर्वच प्रकार वेगळा. त्या गुन्ह्याची व्याख्या नाहीं. त्याला ठरीव शिक्षा नाहीं. त्याचें काम चालण्याची ठरीव पद्धत नाहीं. असा तो सर्व आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ आहे.अशा स्थितींत कोर्टाची बेअदबी मीं केली असें कोर्टानें एकदां मनांत घेतलें तर मी तें नाशाबीत तरी कसे करणार ? लोकांचा न्यायकोर्टावरील विश्वास ढळू नये, व तसे झाल्यामुळे जनतेला आपण कोणत्याहि राज्यांत निराधार झालों असे वाटू नये, म्हणून हल्लींसारखे खटले भरण्यांत येतात, असें काल व आज न्यायनिवाडे वाचतांना मला सांगण्यांत आले आहे. हे म्हणणें सर्व ठीक आहे.

विश्वास कशानें ढासळतो

 पण मी आपणाला असे स्पष्ट सांगतों कीं, माझ्या लिहिण्यापेक्षांहि खुद्द हायकोर्टाच्या निकालानेंच या न्यायपीठावरील जनतेचा विश्वास अधिक ढळून गेला आहे ! न्यायकोर्ट आपल्या हातानेंच आपली बेअदबी करून घेणार असल्यावर वर्तमानपत्रांनी गप्प बसून तरी काय होईल ? काल आज असे सांगण्यांत आलें कीं, कोणीं न्यायाधीशांना इतर हवीं तीं नांवें ठेवावीं. उदाहरणार्थ, त्यांना कायद्याचें ज्ञान नाहीं, त्यांचा निकाल मूर्खपणाचा आहे, असें टीकाकारांस म्हणतां येईल. पण त्यांना अप्रामाणिक म्हणून त्यांची बेअब्रू करतां कामा नये. प्रस्तुत टीकेंत मी झालें तरी न्यायाधिशांची