पान:केसरीवरील खटला.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२५

एका महत्त्वाच्या तत्त्वाची चर्चा

त्यांना संरक्षण मिळेल व येथील त्यांची जीवितयात्रा सुखासमाधानाची होईल त्या त्या रीतीनें तें मिळविणे योग्य व रास्त आहे अशी त्यांच्या मनाची सहजच समजूत होते. व सर्व दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून युरोपि यन अपराध्यांना मदतच होते. या सर्व गोष्टी हे काळ्या लोकांना न्याय मिळण्या- च्या मार्गात आधींच विघ्न असल्यानें युरोपियन ज्यूरीचा निकाल न्यायाधिशांनी वेदतुल्य मानला तर वरील विषम स्थितीत आणखी भरच पडावयाची. 'पांचा मुखीं परमेश्वर' हें तत्त्व चांगले खरें, पण हिंदुस्थानांत गोऱ्या ज्यूरीच्या निकालांना तें सरसकट लावणें हें हास्यास्पद व अन्यायाचें होईल. काळ्या-गोयासंबंधानें येथील परिस्थिति विशेष प्रकारची असल्यामुळे वरील तत्त्वाला स्थानिक परिस्थितीप्रमाणें जरूर ती मुरड घातली पाहिजे. काळा फिर्यादी, काळा आरोपी व काळी ज्यूरी असें असेल, किंवा फिर्यादी आरोपी व ज्यूरी सर्व गोरेच असतील, तेथें ज्यूरीचा निकाल अबाधित ठेवणें हें हिंदुस्थानांतहि अन्यायाचें होणार नाहीं. पण आधींच जड होऊन बसलेल्या गोऱ्या लोकांना काळ्या लोकांचे जीव घेण्याच्या खटल्यांतहि या तत्त्वाचा फायदा डोळे मिटून देणे, म्हणजे ज्याचेजवळ आधीच आहे त्यालाच फिरून देव अधिक देतो अशासारखे होईल ! अशा मुकदम्यांत हायकोर्टानें डोळ्यांत तेल घालून व नेहमींच्या उलट मुद्दाम दृष्टि ठेवूनच वागले पाहिजे. क्रि. प्रो. कोडाच्या १७६ कलमानें ज्यूरीचे निकाल न्याया- करितां फिरविण्याची पूर्ण मोकळीक सुदैवानें ठेवली आहे. सर्व खटला जणूं काय ज्यूरीशिवाय आपल्याच पुढे चालला आहे असे त्यांनी समजावे व खालच्या कोर्टात ज्यूरीनें सर्वानुमतें निकाल दिला असला तरी तो फिरवावा असा अधिकार ह्यांना दिलेला आहे. इं. लॉ. रि. १५ मुंबई पान १५ या ठिकाणी न्या. मू. वेस्ट हे लिहितात की, 'या देशांत गोष्ट न्यायाची असेल तर ज्यूरीचा निकाल फिरविण्यास हायकोर्टानें मुळींच मागेंपुढे पाहूं नये. निकाल ज्यूरीचा म्हणून जजांनी कानाडोळा केला तर तो न्यायाचा विश्वासघात होईल.' मी या कोर्टाला उघड व स्पष्ट बजावतों कीं, वॉकरच्या मुकदम्यांत या हायकोर्टानें ज्यूरीचा निकाल फिरविण्याच्या कामी कानाडोळा केला त्यामुळे न्यायाचा धडधडीत घात झाला आहे. ज्यूरीचा निकालहि विपरीत असूं शकतो, व तसा तो या प्रकरणीं झाला