पान:केसरीवरील खटला.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४
केसरीवरील खटला

स्वतः पारड्यांच्या विषमतेमुळे माप खोटें दिलें गेलें. खोटेपणा पारड्यांचा, दांडी हातांत धरणारांचा नव्हे. पारडी विषम म्हणून तराजू खोटी असली तर, माप देणारा जें माप देतो तें तो न कळत खोटें देतो पण खोटें देतो असेच म्हणावे लागतें. ताजवा खोटा असेल तर पारडी सारखीं करण्या- करितां हलक्या पारड्यांत पासंगाकरितां मुद्दाम वेगळें लहानसे वजन टाकावें लागतें हैं प्रसिद्ध आहे. आरोपी गोरा व ज्यूरी गोरी हाच गोया पारड्याचा जडपणा; म्हणून हायकोर्टाने ज्यूरीचा निकाल सेशनजजाच्या शिफारशीप्रमाणे, अमान्य करणे यालाच मी मेलेल्या काळ्या मनुष्याच्या पारड्यांत पासंगाचें वजन घालणें असें म्हणतों; व तें वजन त्यांनी घातले नाही म्हणून न्यायाचें माप खोटें झालें ! या देशांत काळ्यागोयांच्या विरोधप्रसंगी गोऱ्या ज्यूरीच्या निकालाकडे करड्या नजरेने पाहण्याची जी जबाबदारी हायकोर्टावर येऊन पडते ती त्यांनी या प्रसंगी ओळखली नाहीं, हें मला आपणापुढे होईल तितक्या तीव्र भावनेने मांडावयाचे आहे.

एका महत्त्वाच्या तत्त्वाची चर्चा

 इंग्लंडांत पूर्वी ज्यूरांना न्यायाधिशाविरुद्ध आपले स्वातंत्र्य स्थापन करण्या- करितां केवढा मोठा झगडा चालविला होता हें प्रसिद्ध आहे. व्यक्तिस्वातंत्र्य व मतस्वातंत्र्य यांकरितां तो झगडा चालू होता. म्हणजे एका अर्थानें ब्रिटिश लोकसत्तेचा आत्मा विकास पावण्याचा काल होता. अशा वेळी ज्यूरीच्या निकालांत न्यायाधिशांनी हात घालून तो फिरवूं नये हैं इष्ट व योग्य होतें. हिंदुस्थानांत त्याच्या अगदी उलट स्थिति आहे. विशेषतः हिंदी लोकांचा जीव व स्वाभिमान यांविरुद्ध गुन्हे केल्याबद्दल युरोपियन लोकांचा इनसाफ होत असतो, तेव्हां तर ज्यूरीच्या निकालासंबंधीं न्यायाधिशांनीं फार दक्षता ठेविली पाहिजे. कारण युरोपियन आरोपीला आपल्या जात भाईचें बहुमत ज्यांत आहे अशी ज्यूरी मागण्याचा अधिकार असतो. शिवाय येथें हिंदी लोकांना प्रतिकूल व युरोपियन लोकांना अनुकूल अशाच अनेक गोष्टी असतात. गोऱ्या लोकांना आपण काळ्या लोकांपेक्षां श्रेष्ठ व या देशांतील सर्व गोरे लोक म्हणजे एक बंधुमंडळ आहों असें मनांतून वाटत असतें. राजकीय वर्चस्वाची भावना कळत न कळत त्यांच्या मनांत खेळत असते. गोरे लोक हिंदुस्थानांत थोडे म्हणून ज्या ज्या रीतीनें