पान:केसरीवरील खटला.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२
केसरीवरील खटला

कडे अधिक दोष कसा येतो हे मला दाखविले पाहिजे. तें आपण गैरलागू कसें म्हणतां ? खोट्या न्यायाचें माप दिलें येवढेच आपण धरून बसतां, आणि येथें हातांत ताजवा धरणारापेक्षां स्वतः ताजव्याचा दोषच अधिक कसा आहे हे मी दाखवूं लागलों तर हरकत घेतां ? ताजव्याचीं दोन पारडी सारख्या वजनाचीं नाहींत हें हल्लींच्या पद्धतीची चर्चा केल्याशिवाय मी कसे सिद्ध करूं ? ज्यूरर लोक हे सर्व जगभर कसा न्याय देतात, व त्यांच्या निकालासंबंधानें म्हणजे त्यांच्या पक्षपातबुद्धीसंबंधानें सगळ्या जगांतले लोक काय म्हणतात, हे दाखविल्याशिवाय पुण्याच्या युरोपियन ज्यूरीचा निकाल पक्षपातीपणाचा असूं शकेल हें अनुमान मी कसें सिद्ध करणार ?

चर्चा करूं द्या मग पाहा

 न्या. मार्टेन – जातिनिष्ठ भेदाभेदासंबंधानें मी तुम्हास चर्चा करूं देणार नाहीं.

 केळकर – ती सोडली. पण हायकोर्टाचा निकाल किती व कसा चूक होता हैं तरी सांगू द्याल कीं नाहीं ? तो निकाल चूक होता म्हणून तो तुम्ही. आज फिरवा, असे म्हणावयास का मी येथे आलो आहे ? तुम्हांला तो फिरवावा- सा वाटला तरी तो आतां फिरणार नाहीं, ही साधी गोष्टहि मला कळत नाहीं असे आपण समजतां काय ? निकाल झाला तो झाला. वॉकर सुटून खुशाल घरीं गेला आणि गोळी लागून मेलेला लोहगांवचा अर्जुना निजधामाला गेला! त्याचें आतां काय ? पण त्या निकालाची चूक शिल्लकच राहाते; व ती चूक केवढी आहे, किती मोठी आहे, हे मी दाखवूं शकलों तर माझ्या लिहिण्या- च्या हेतूप्रमाणेंच निकाल देणारांच्या मनःस्थितीवर प्रकाश पडेल. तो निकाल जितका अधिक चूक असल्याचे मला ठरवितां येईल तितका पक्षपाताच्या आरोपाचा मजवरील आरोप त्या प्रमाणानें हलका होईल, तें दाखवूं न द्याल तर मला एरवीं तक्रार सांगावयाला जागा ती काय उरणार ?

 न्या. मार्टेन – पंचवीस बाँचे लॉ-रिपोर्टरचें पान २३-२५ काढून पाहा.. तो आधार येथें लावून तुम्ही तो निकाल चूक आहे असे एकदम म्हणून टाकाना ? पण चूक नसलेला निकाल तुम्हीं चूक म्हटला हा तुमच्यावर