पान:केसरीवरील खटला.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८
केसरीवरील खटला

कोर्टाच्या बेअदबीशीं त्यांचा संबंध काय ? राजकीय वादांतील तें सर्व- सामान्य विधान आहे. त्याविषयी माझ्या मनांत हजारों उदाहरणें येतात. प्रस्तुतच्या एकट्या एक उदाहरणावर अशा भारी अनुमानांची जड इमारत मी कशी उभारीन ? मला ही साधी गोष्ट कळत नाहीं काय ? मला परवानगी द्याल तर मी शेंकडों उदाहरणें सांगेन. लोकमत मी म्हणतो असेंच आहे. तें मत कसें मांडावें हा प्रश्न वेगळा. पण त्या मताबद्दल आपणाला शंका नको.

 असो. आतां मी सर्व लेख एकत्र घेऊन त्याचा आशय सांगतो. या लेखाचे तीन विभाग स्वाभाविकपणे पडतात ते असे:- -

 १ हायकोर्टाच्या निकालावर टीका,

 २ हिंदुस्थानांतील सर्वसामान्य न्यायदान पद्धतीवर टीका, अर्थात् त्यांतील युरोपियन लोकांचा संबंध लक्षांत ठेवून.

 ३ न्यायपद्धतीला अनुलक्षूनच पण आमच्या-आमच्यांतील वाद. ( या ठिकाण केळकर यांनी आक्षित लेखांतील निरनिराळी वाक्ये घेऊन तीं कोणकोणत्या सदराखाली कशी पडतात हे दाखविलें.)

एका उपमेचा अनर्थ !

 • प्रथम ही गोष्ट आपण लक्षांत घ्या कीं, जी काय सर्व जिकीर वाटते ती फक्त एका उपमेमुळे ती उपमा ताजव्याची. लिहिण्याबोलण्यांत उपमा- दिकांच्या मोहाचा पगडा मनुष्यमात्रावर किती असतो हे आपण जाणतच असाल, उपमांच्या उपयोगाचे परिणामहि कित्येक वेळां न कळत वाईट होतात. एक तर उपमा समर्पक करण्याकरितां अंगें-उपांगें सजविण्याचा मोह पडतो, व मग त्यांतून लिहिणाराच्या मनांत नाहीत असेहि अर्थ निघू शकतात. आणि हा दोष माहीत असतांहि उपमा येतातच. पण सुदैवानें न्यायाचे बाबतींत ताजव्याचीच उपमा सर्वत्र घेतली जाते.

 न्या. मार्टेन - - यालाहि तुम्ही आतां आधार दाखविणार कीं ? या हायकोर्टाच्या इमारतीच्या डोक्यावर पाहा म्हणजे तेथे तुमचीच उपमा मूर्तिमंत आढळेल !

 केळकर खरें आहे. असो. आतां वर सांगितलेल्या तीन विभागां-