पान:केसरीवरील खटला.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आक्षिप्त वाक्यांची चर्चा

यांच्या निकालावरचें अपील ऐकण्याला आम्ही येथें बसलों नाहीं, हें तुम्हीं लक्षांत ठेविले पाहिजे. तो निकाल बरोबर किंवा चूक हे आम्ही येथे ठरविणार कोण ? मी एवढेच म्हणत होतों कीं, बंदूक मांडीशी होती ती उडविली गेली यावरून नेम धरून गोळी मारली नसावी.

 केळकर – त्या न्यायमूर्तीच्या निकालाची चर्चा करणें हाच तर माझा मुख्य मुद्दा आहे. रायफलविषयीं माझ्या अज्ञानाचा आपण उल्लेख केला म्हणून तेवढ्यापुरता मीहि मॅजिस्ट्रेटच्या निकालाचा येथें उल्लेख केला. त्याचा खरा उल्लेख व त्याची खरी चर्चा मी पुढे करणारच आहे. असो. “संभव तोलण्याचा हा ताजवा कोर्टानें कोठून पैदा केला कोण जाणे ?" हे वाक्य आतां घेऊं. त्याचा अर्थ हा ताजवा खोटा होता इतकेंच सुचविण्याचा आहे. हा उत्तरगर्भ प्रश्न आहे; याला "विधानार्थी प्रश्न" असे म्हणतां येईल, प्रश्नच स्वतः आपले उत्तर देतो. त्याचें उत्तर हेंच कीं, असला ताजवा जगांत सहसा कोठेंहि मिळणार नाहीं. याचाच अर्थ ताजवा खोटा. मात्र मूळ वाक्य वाच्या थनेंच घ्यावयाचें नाहीं. स्वतः प्रश्नानें दिलेल्या उत्तराला भर म्हणून पुढच्या वाक्यांत लेखकहि म्हणतो की, "ताजव्याचें एक पारडें गोरें व एक पारडे काळे आहे; तेव्हां एक अधिक जड होऊन खालीं बसणारच यांत आश्चर्य काय ?

 न्या. मार्टेन- - याचा मला आणखी खुलासा हवा.

 केळकर – तो मी आणखी पुढे करणारच आहे. तूर्त आपण पुढे वाचूं. असल्या खोट्या मापाने मिळालेला न्याय इत्यादि, हे वाक्य घ्या. न्या. मार्टेन – “खोटा ताजवा " हे शब्द महत्त्वाचे आहेत त्यांवर खूण करा.

 केळकर – कमी अधिक जड अशीं ज्याचीं पारडीं तो ताजवा खोटा, व त्या ताजव्याचें मापहि खोटें, यांत अवघड तें काय ? असो, यापुढील वाक्यांत मनुस्मृति जाळण्याचा वाद व लोहगांवीं स्तंभ उभारण्याची चर्चा आहे.

 न्या. मार्टन-पण त्याच वाक्यांत ब्रिटिश राज्यांतील न्याय व हिंदी प्रजाजनांच्या प्राणाची किंमत हेहि शब्द आहेत हे लक्षांत ठेवा.

 केळकर – त्या शब्दांचें जोखीम मी पुरें जाणून आहे. पण तुमच्या

           के. ख....२

.