पान:केसरीवरील खटला.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२
केसरीवरील लेख

शब्दावर मी जोर देतों. कारण या कामीं मुख्य दोष ज्यूरर लोकांचा आहे. ते युरोपियन होते असें मी म्हणत आहे.

 न्या. मार्टेन - - तें वाक्य सत्याला थोडे सोडून आहे. ज्यूरींत चार युरोपियन असले तरी एक हिंदी गृहस्थ होता.

 केळकर – पण विचारा सरकारी पेन्शनर होता ! तें कसेंहि असो. लेखांत प्रथमदर्शनींच 'युरोपियन ज्यूरर्स' हा शब्द आल्यावरून मीं कोणत्या दृष्टीने या प्रकरणी पाहिले हे कळून येईल.

 न्या. मार्टेन पुढे चला.“गोऱ्या आरोपींच्या चौकशीचे असले फार्स " या वाक्यांतील 'फार्स' याचा अर्थ काय समजावयाचा ?

 केळकर -- मी सांगतों. फार्स म्हणजे हास्यास्पद नाट्यप्रकार कोणती एकादी गोष्ट एकदम अनपेक्षित रीतीनें व गांभीर्यभंग करण्यासारखी घडणें हें हास्याचें विभाव कारण होय.

 न्या. मार्टेन - - मी या ( वॉकरच्या) खटल्याला ( मॉक ट्रायल) 'लुटपुटीच्या चौकशीचा" प्रकार असें म्हणूं काय ?

 केळकर --तसेंच केवळ नाहीं. कारण निकालापर्यंत खटल्याचा विषय गंभीर वृत्ति उत्पन्न करण्यासारखाच होता. निकाल अनपेक्षित झाला तेव्हांच त्यांत हास्यवीज निर्माण झाले, हायकोर्टात वॉकर निर्दोषी ठरून सुटेपर्यंत गंभीर विचारांनीच लोकांचें मन व्यग्र होतें. आणि शेवटीं एकदम पहावें तो हायकोर्टानें त्यांच्या अदमासाच्या अगदी उलट निकाल दिला ! मग हा प्रकार हास्यास्पद कां न वाटावा ? मी आपणाला स्पष्ट सांगतों कीं, हा निकाल ऐकून लोक हंसलेच असले पाहिजेत. लोक म्हणजे मात्र दूर इलाख्यांतील लोक नव्हत, तर लोहगांवचे लोक, पुण्याच्या आसपासचे लोक, म्हणजे ज्यांना सर्व प्रकार माहीत होता व अखेर निकाल काय होतो याकडे ज्यांचे डोळे लागले होते असे लोक. वॉकरच्या गोळीनें लोह- गांवचा मनुष्य मेला हा विषय लोकांच्या एकसारखा तोंडीं होता. आदल्या नोव्हेंबरपासून पुढच्या मार्चपर्यंत मॅजिस्ट्रेटपुढे, सेशन जजापुढें खटला चालू असल्याने विषय ताजा. पुष्कळ लोकांना या अपघातामुळे फार दुःख वाटले, पुष्कळ लोकांची अशी समजूत असते कीं, युरोपियनांवर अशा चावतींत खटला झाला म्हणजे तो आपला शेवटीं सुटावयाचाच ! म्हणूनहि