पान:केसरीवरील खटला.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०
केसरीवरील खटला
दिवस दुसरा
शुक्रवार ता. ८ ऑगस्ट

 दुसऱ्या दिवशी कोर्टातील इतर किरकोळ काम झाल्यावर १२ वाज- ण्याचे सुमारास केळकर यांनी आपली तक्रार पुढे सांगण्यास सुरवात केली. ते म्हणाले–माझी लेखी कैफीयत काल मला परत देण्यांत आली त्याबद्दल माझी विशेष तक्रार नाहीं. या खटल्यांतील मुद्दा संकुचित कां व कसा आहे हे कोर्टाने सांगितले हैं ठीकच आहे. सरकारी वकील यांनीहि आपल्या भाषणांत माझ्या लेखांतील एक दोन वाक्यांचाच उल्लेख करून मुख्य भर कायद्याच्या तत्त्वांचे विवरण करण्यावरच टाकला. ते वावगे कांहीं बोलले नाहीत, याबद्दल मी त्यांचाहि आभारी आहे. वादांतील मुद्यांचा संकोच झाला तर तो बराच मला तरी अधिक बोलून काय करावयाचें ? पण भीति एवढीच वाटते कीं, एक दोन वाक्यांवरच भर दिला गेला म्हणून मीं तेवढ्यावरच तक्रार सांगितली, आणि पुढे निर्णय देण्याचे वेळीं न्यायमूर्तींनी किंवा उत्तर देतांना सरकारी वकिलांनी इतर वाक्यांवर भर दिला तर मी मग काय करणार ? मुद्द्यांचा संकोच हवा, पण अतिसंकोच करणें हेंहि चुकचें होईल. म्हणून माझ्या लेखांतील आणखी कोणत्या वाक्यांना हरकत घेण्यांत येणार आहे हे मला आधीच कळलेलें बरें. अशीं वाक्यें इतर आणखी नाहींत असे मला आतांच स्पष्ट सांगण्यांत आले तर उत्तमच झालें.

 न्या. मार्टेन – तुमचा लेख पूर्वी वाचण्यांत आलाच आहे व तुम्ही तो वाचाल तेव्हां महत्त्वाच्या वाक्यांवर आपण खुणा करीत जाऊं.

 केळकर – ठीक आहे. मी लेख वाचीत जातों, आपण वाक्यांवर खूण करून सांगत जावें, व मी त्यांचा खुलासा करीत जावा हा क्रम बरा दिसतो. तथापि अशा खटल्यांत मोजके शब्द दाखवून चार्ज भरणें जरूर आहे. यावर ऑस्वोलडच्या ग्रंथांतील मी आधार दाखवितों.

 न्या. मार्टेन -- हां हां, ऑस्वोलड होय ? तो ग्रंथकार माझ्या परिचया- चा आहे. त्याचें पुस्तकहि मी वाचले आहे. ( या ठिकाणीं या ग्रंथकारा- विषयी थोडी माहितीहि न्या. मू.नी सांगितली.)