पान:केसरीवरील खटला.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खटला स्वतः चालविण्याचें कारण

शिवाय माझे मित्र म्हणून तरी शिंगणे हे मजजवळ बसणार आहेत. त्यांची मदत कोर्टाला न झाली तरी मला खास होईल. मीच जातीने 'डिफेन्स' देणार याबद्दल दुसरीहि एक विनंति मला कोर्टाला करावयाची आहे. ती अशी कीं, वकील न देण्यांत वकिलीच्या धंद्यासंबंधानें माझा अनादर आहे किंवा जातीने काम चालविण्यांत माझी यत्किंचितहि अहंकारबुद्धि आहे, अशी समद्धृत कोर्टानें कृपा करून घेऊं नये. बाहेर इतर लोकांनाहि माझी तीच विनंती आहे. वकिलीच्या धंद्यासंबंधाने माझी फार आदबुद्धि आहे. स्वतः मीहि एक सनदी वकील आहे, परंतु वर्तमानपत्रकाराचा धंदा मला अधिक आवडतो येवढ्याकरितांच त्यांत शिरलो. अहंकारबुद्धीमुळे मी माझा खटला स्वतः चालविला तर कदाचित् त्यानें माझा तोटा काय होईल हँहि मी जाणतों. मला वकिली कामाची संवय नसल्याने, आपण जरी कृपा करून वेळोवेळीं संभाळून घ्याल, , तरी कांहीं कांहीं चुका माझेहातून होणारच. येवढी जबर किंमत देण्याइतकी माझी अहंकारबुद्धि वर आलेली नाही. पण स्वतः खटला चालविण्याचे माझें खरें कारण हेच की, हा खटला मजवर व्यक्तिशः आहे असें मी मानीतच नाही. माझ्या धंद्यांतील इतर भाऊबंदांचे कामहि याच कामांत थोडेबहुत मजकडून होण्याचा प्रसंग आहे म्हणूनच हे काम मी अंगावर घेतले आहे. हे काम म्हणजे वर्तमानपत्राचे स्वातंत्र्य अधिक प्रस्थापित करण्याविषयींचें. माझ्या स्नेही वकीलमंडळींनीहि, याच कारणा- मुळे, माझी तक्रार मींच मांडावी हे योग्य आहे असा सल्ला मला दिला. आक्षिप्त लेख म्हणून जी दोन माझी रफुटें आपणांपुढे आली आहेत त्यांच्याच अनुरोधानें अवांतर विषयांची चर्चा आपणांपुढे मला करतां येऊन, ज्या मनःस्थितीवरून मीं लेख लिहिले ती मला कोर्टापुढे मांडतां येईल. आपण ती मनःस्थिति जरूर तपासून घ्यावी. व मला वाटतील ते प्रश्न विचारावे. आतां मी स्वतःच आरोपीच असल्याकारणाने माझ्या मनांतील सर्वच विचारांचा गोळीबार मला कोर्टावर करता येणार नाहीं. पण कोर्टाच्या विचारांचा गोळीवार होईल तो तूर्त सर्व आपल्या अंगावर मला घेतलाच पाहिजे व तो घेण्याची माझी तयारीहि आहे.”

 याप्रमाणे भाषण चालू असतां कोर्टापुढे दुसरा एक खटला त्याच वेळीं चालावयाचा असल्यानें या खटल्याचें काम शुक्रवारपर्यंत तहकूब ठेवण्यांत आलें.