पान:केसरीवरील खटला.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
केसरीवरील खटला

 न्या. मार्टेन —तोंडी तक्रार सांगतांनाही अनुक असे म्हणतो, तमुक असे असें म्हणतो असे आधार तुम्हांस दाखवितां येणार नाहीत. मुख्य मुद्दा फारच सूक्ष्म आहे.

 केळकर—ठीक आहे. पण लागू कोणतें, गैरलागू कोणतें याविषयीं कोर्टाचें मत मला आधी कसे कळणार होतें ? तरी मी बोलत जाईन तेव्हां कोर्टाने वेळोवेळीं लागू-गैरलागू याविषयीं योग्य ती सूचना मला करावी, ती मी खचित मान्य करीन. माझें म्हणणे मांडण्याची अर्थात् मी कसोशी करणारच, पण त्यावरील कोर्टाचा निर्णय केव्हांहि मला मान्यच करावा लागणार.

 न्या. मार्टेन–(हंसून) तुमची लेखी कैफीयत फार मोठी आहे. इतके कागद खर्ची कां घातलेत ?

 केळकर – या कामी माझा सॉलिसिटर मी व माझा बॅरिस्टरहि मीच असल्याकारणानें कागदाच्या खर्चाकडे मला दुर्लक्ष करतां आलें! कैफीयत लांब खरीच. पण माझ्या धंद्यांत पुष्कळसे लिहिण्याची मला संवय आहे. मी एलएल. बी. असून सनदाई घेतली आहे. पण मी वकिलीचा धंदा करीत नसल्यानें चटावर तक्रार सांगण्याची मोजकें बोलण्याची- वकिली खुबी मला साधलेली नाहीं. पण हा मुद्दा निवाला म्हणून येथेंच हें सांगतों कीं, या काम केवळ वकिली तक्रारच कोर्टास सांगावयाची असती तर माझ्या प्रतिष्ठित स्नेही मंडळीपैकी कोणीहि तें काम मजकरितां आनंदानें केलें असतें. पण या काम वकिलांना तसदी देण्याची माझी इच्छाच नव्हती. शिंगणे यांचे वकीलपत्र प्रथम दाखल असतांहि मागाहून तें रद्द करण्यांत आलें याविषयों एरवी न्यायमूर्तीचा कदाचित् गैरसमज झाला असता म्हणून ही गोष्ट मला उघड सांगावी लागत आहे.

 न्या. मार्टेन—त्यांत गैरसमज कसला? आरोपी या नात्यानें तुमची इच्छा असल्यास जातीने हजर राहून खटला चालविण्याचा तुम्हाला अधि- कारच आहे. शिंगणे काम चालविते तर कायदेशीर मुद्दयांच्या चर्चेत आम्हांला अधिक मदत मिळाली असती ती आतां मिळणार नाहीं इतकेंच काय तें !

 केळकर – त्याचीहि काळजी आपणाला फारशी नको. मीहि हा कायदा थोडाबहुत पाहिला आहे हे लवकरच आपल्या नजरेस येईल.