पान:केसरीवरील खटला.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
न. चिं. केळकर यांचे भाषण

 यानंतर पाटकर यांनी पूर्वीच्या अनेक खटल्यांच्या निकालांतील उतारे वाचून दाखवून कोर्टाची बेअदबी झाली असे केव्हां मानण्यांत येतें याविषयीं चर्चा केली. त्यांत १९०८ सालच्या 'मराठा' पत्रावरील खटल्याचाहि उल्लेख केला. शेवटीं पाटकर म्हणाले, केसरींतला हा लेख रास्त टीकेच्या मर्यादेत आहे की काय हे ठरविण्याचें काम न्याय- मूर्तीचे आहे. असल्या सार्वजनिक स्वरूपाच्या खटल्यावर टीका करण्याचें वृत्तपत्रांना स्वातंत्र्य आहे परंतु या लेखनस्वातंत्र्याची मर्यादा व्यक्तीच्या स्वातंत्र्याहून अधिक नसते, असा ४१ इंडियन अपील्स पृ. १६९ यांत अभिप्राय दिलेला आहे. केसरींतील टीकेनें जनतेचा कोर्टाच्या न्यायीपणा- वरील विश्वास डळमळतो असें कोर्टाचें मत झाल्यास कोर्टानें प्रतिवादीवर काम चालवावें.

न. चिं. केळकर यांचें भाषण

यानंतर न. चिं. केळकर हे आपल्या बचावाचें भाषण करूं लागले. प्रथमतः त्यांनी आपल्या कैफियतीचा उल्लेख केला. ते म्हणाले, मी एक प्रतिज्ञालेख कोर्टात दाखल केला आहे, तो पाटकर यांनी वाचलाच आहे. त्याबरोबरच मी आपली लेखी कैफियतहि दाखल करून तिच्या प्रती उभयतां न्यायमूर्तीस देण्याकरितां शिरस्तेदार यांजजवळ दिल्या होत्या त्या आपणांस मिळाल्या असतीलच.

 न्या. मार्टेन — मीं तुमची कैफीयत काळजीपूर्वक वाचली. त्यांतला बराच भाग गाळावा लागेल असें माझें मत आहे. लॉर्ड कर्झन काय बोलले अगर रंगाचार्य काय म्हणतात हे पाहाण्याचे आम्हांस येथे प्रयोजन नाहीं. फक्त हायकोर्टाचे लॉ-रिपोर्टच येथें मंजूर आहेत. कोर्ट ही एखादी राजकीय सभा किंवा डिबेटिंग सोसायटी नाहीं. आमच्यापुढील मुद्दा अगदी मर्यादित आहे. तुम्ही आपल्या लेखांत जज्जावर अप्रामाणिकपणाचा आरोप केला कीं नाहीं, एवढाच विचार आम्हांस कर्तव्य आहे.

 केळकर – ठीक आहे; माझी लेखी कैफीयत मी परत घेतों. पण माझ्या भाषणांत त्यांतलेच आधार मी देणार आहे. त्यांत एकादा मुद्दा गैरलागू असल्यास तो आपण कळवालच. कोर्टाच्या व सरकारी वकिलाच्या व माझ्या माहितीकरितां मीं हें 'बीफ' म्हणून तयार केले होतें.