७८ । केसरीची त्रिमूर्ति
आहेत; पण आपल्या देशास माघारी आले की पुन: इंग्रेजचे इंग्रेजच! त्याचप्रमाणे इतक्या भाषा इंग्रेजीशीं मिसळल्या असतांहि ती कायमची कायमच "
ही विष्णुशास्त्री यांची दृष्टि होती. त्यांना पाश्चात्त्य विद्या हवी होती. धाडस, साहस, शोधकपणा इत्यादि पाश्चात्त्य गुण हवे होते. त्यांच्या ग्रंथांचा अभ्यास हवा होता. संपत्ति, षड्विकार यांच्या बाबतींत त्यांचा आदर्श हवा होता. देशाभिमानासाठी त्यांना गुरु करण्यास त्यांची तयारी होती. त्यांचे वाङ्मय, त्यांचें साहित्यशास्त्र, त्यांचें इतिहासलेखन, त्यांची विद्याभिरुचि त्यांना अत्यंत प्रिय होती; पण हे सर्व स्वीकारतांना हिंदी जन हिंदीजनच राहिले पाहिजेत, असा त्यांचा प्रखर आग्रह होता.
येथून पुढे 'टीकाकार', 'चरित्रकार' व 'निबंधकार' या दृष्टींनी विष्णुशास्त्री यांचा अभ्यास आपणांस करावयाचा आहे. या तीनहि प्रकारच्या लेखनांत त्यांच्या जीवनाचें हें सर्व तत्त्वज्ञान, त्यांच्या विचारसरणीचे हे सर्व घटक, त्यांना अभिप्रेत असलेल्या मानसिक क्रांतींची हीं सर्व लक्षणे दिसून येतात. म्हणून प्रारंभीच तीं सर्व येथे एकत्र सांगितलीं आहेत.
पाश्चात्त्य टीकापद्धति
टीकाकार या दृष्टीने विष्णुशास्त्री यांनी एक अत्यंत महत्त्वाचें कार्य केलें आहे. त्यांनी सर्व पाश्चात्त्य टीकापद्धति मराठीत आणली. ती पद्धति त्यापूर्वीच्या काळीं भारतांत कोठेहि नव्हती. येथे साहित्यशास्त्र निर्माण झालें होतें. पण त्या शास्त्रांतील सिद्धान्तांअन्वये काव्य-नाटकांचें परीक्षण कोणी करीत नसत. मल्लीनाथ हा फार मोठा टीककार होऊन गेला; पण अर्थबोध करून देणें व फार तर एखादा अलंकार स्पष्ट करणें यापलीकडे त्याने कधीहि टीका केली नाही. त्या काळच्या पंडितांची अभिरुचीहि अतिशय हीन होती. काव्याच्या खऱ्या गुणांचा त्यांना समजच नव्हता. यमक, अनुप्रास, श्लेष इत्यादि शाब्दिक करामती म्हणजेच काव्यगुण असें त्यांना वाटे; आणि त्यामुळे कालिदास, भवभूति, यांच्यापेक्षा तसली करामत करणारा माघ त्यांना श्रेष्ठ वाटे. त्यांच्या काव्य-समीक्षणांतला आणखी एक मोठा दोष म्हणजे गुणदोष- चिकित्सा ते कधीच करीत नसत. मोठ्या लोकांवर टीका करण्याचा आपल्याला अधिकार नाही, अशी त्यांची वृत्ति होती. त्यामुळे सुबंधूसारख्या अत्यंत गचाळ कवीचाहि ते गौरव करतांना दिसतात. तेव्हा तात्पर्य असें की, हिंदुस्थानांत काव्यसमीक्षा, टीका, रसग्रहण हा साहित्यप्रकारच उदयास आला नव्हता. इतिहास, चरित्र, निबंध यांच्याप्रमाणे याहि क्षेत्रांत विष्णुशास्त्री यांना नवाच संसार मांडावयाचा होता.
दोषदर्शनहि
आणि त्यामुळे टीका म्हणजे काय, ती करणाऱ्याचे अंगीं कोणते गुण असावे लागतात, टीका करतांना गुणदोष- चिकित्सा करणे किती अवश्य असतें, हें सांगण्यापासून त्यांना प्रारंभ करावा लागला. 'ग्रंथावर टीका' या आपल्या निबंधांत त्यांनी