Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

टीकाकार विष्णुशास्त्री । ७९

याविषयीचे आपले सव विचार मांडले आहेत. इतर लेखांत "काव्य म्हणजे काय हें एकंदर लोकांस कांहीच कळत नाही" "आमच्या मराठी वाचकांस अद्याप म्हणण्यासारखी रसिकता आलेली नाही.' असें त्यांनी वारंवार सांगितलेच आहे, व त्यासंबंधी तेथे स्पष्टीकरणहि केलें आहे. 'ग्रंथावर टीका' या निबंधांतील येथे लक्षणीय विचार एवढाच की, अनेक प्रकारे युक्तिवाद करून, त्यांनी टीकाकाराने निर्भयपणें काव्यांतील गुणांप्रमाणेच दोषांचीहि चिकित्सा केली पाहिजे हे पुनः पुन्हा आवर्जून सांगितले आहे. ते म्हणतात की, "सर्व गुणांनी संपन्न असा एकहि मनुष्य सापडणार नाही. तसेंच ज्यांत लेशमात्रहि दोष आढळणार नाही, असाहि सापडणें केवळ अशक्य. आता कोणी म्हणतील की, मोठ्यांच्या अंगों दोष असले तरी ते लहानाने काढू नयेत; पण हे म्हणणे म्हणजे चंद्रास कलंकी म्हणूं नये, किंवा सूर्यबिंबावरचे काळे डाग पाहूं नयेत, असें म्हणण्यासारखेंच असमंजस होय."
 याप्रमाणे टीकाशास्त्रांतले कांही विचार या निबंधांत सांगितल्यावर विष्णुशास्त्री यांनी 'टेंपेस्ट' व 'तारा' या शेक्सपियरच्या नाटकांच्या मराठींतल्या भाषांतरांवर पुढील कांही अंकांत, त्याअन्वये टीका केली आहे; पण विष्णुशास्त्री यांचे महत्त्वाचे टीकालेख म्हणजे 'संस्कृत कविपंचक' या ग्रंथांतील होत. ते त्यांनी १८७२ सालींच शालापत्रक या मासिकांतून प्रसिद्ध केले होते; पण हे निबंध आधी लिहिलेले असले तरी निबंधमालेंत त्यांनी सांगितलेली टीका-तत्त्वेंच त्यांत अनुसरलेलीं आहेत. अर्थात् हीं सर्व पाश्चात्त्य टीकाशास्त्रांतील तत्त्वें आहेत; आणि वर सांगितल्याप्रमाणे ही पद्धतीच सर्वस्वीं नवीन असल्यामुळे त्या निबंधांचा येथे प्रथम परामर्श केला पाहिजे.
नवीन टीका
 कालिदास, भवभूति यांच्या काव्य-नाटकांचें समीक्षण करतांना विष्णुशास्त्री यांनी संविधानकाची रचना, स्वभाव- लेखन, शृंगार, वीर, करुणादि रस, भावना, मनाचे स्वाभाविक व्यापार, निसर्ग-वर्णन, प्रसंग वर्णन, रम्य कल्पना, मधुर कोमल पदरचना इत्यादि काव्यसौंदर्याचे जे खरे घटक त्याअन्वयेच समीक्षा केली आहे. संविधानकाचें परीक्षण करतांना त्यांतील घटनांची स्वाभाविकता, त्यातील संगति- विसंगति, संभाव्यता यांची चर्चा करून महाभारत रामायणांतील मूळ कथेंत कवीने कोणते फेरफार केले आहेत व ते कां केले आहेत, याचाहि विचार ते करतात. वरील कवींची बहुतेक कथानकें अशीं उसनी घेतलेलीच असल्यामुळे हा विचार अवश्यच होता.
 हें सर्व समीक्षण करीत असतांना जागोजागीं शास्त्रीबुवांनी कालिदास, भवभूति यांची होमर, शेक्सपियर, मिल्टन वर्डस्वर्थ या पाश्चात्त्य कवि- श्रेष्ठांशी तुलना केली आहे. तसेच त्या श्रेष्ठ भारतीय कविवरांच्यासंबंधी सर विल्यम जोन्स, गटे इत्यादि पाश्चात्त्य पंडितांनी जे गौरवोद्गार काढले तेहि उतरून दिले आहेत.