-११-
टीकाकार विष्णुशास्त्री |
विष्णुशास्त्री यांच्या जीवनाचे ध्येय काय होतें, त्यांच्या बहुविध कार्यांचें उद्दिष्ट काय होतें, दहा वर्षांत 'शालापत्रक', 'निबंधमाला' व 'केसरी' यांत त्यांनी जें अनेक प्रकारचें साहित्य निर्माण केलें त्यांतून त्यांना अंततः काय साध्य करावयाचें होते याची, आतापर्यंत केलेल्या विवेचनावरून स्पष्ट कल्पना यावी, असें वाटतें.
लेखणीचे उद्दिष्ट
त्यांना या भूमींत नवी सृष्टि निर्माण करावयाची होती. येथल्या मानवी मनांत फार मोठें परिवर्तन घडवून आणावयाचें होते. येथले सर्व लोक पुराणयुगांत राहत होते, त्यांना वास्तवांत आणून उभे करणें हें त्यांच्या लेखणीचें उद्दिष्ट होतें. पुराणांतल्या देवदेवतांच्या असंभाव्य कथा, त्यांतले अद्भुत चमत्कार लोकांना खरे वाटत असत. इंग्रज हे रावणासारखे आहेत व त्यांच्या पराभवासाठी राम पुन्हा अवतार घेईल, अशी त्यांची श्रद्धा होती. अशा या लोकांना कार्यकारणांच्या नियमांचा बोध करावा, वास्तव सृष्टि पुराणसृष्टीहून अगदी निराळी आहे, हें त्यांन. शिकवावें, हा त्यांचा हेतु होता. हजारो वर्षे येथले लोक शब्दप्रामाण्यवादी होऊन त्यांच्या ठायीची, कार्यकारणाने, तर्काने, अनुभवाच्या आधाराने विचार करण्याची शक्ति नष्ट झाली होती. ती शक्ति जागृत करण्यासाठी विष्णुशास्त्री प्रयत्नशील होते.
जवळ जवळ प्रत्येक निबंधांत, आमच्या जुन्या लोकांच्या कांही विलक्षण समजुती आहेत, त्यांना विचार करण्याची सवय नसल्यामुळे त्या दृढ होऊन बसल्या आहेत, म्हणून त्यांना ज्ञान देऊन, विचार करण्यास शिकविलें पाहिजे, हा विचार त्यांनी मांडलेला आढळतो. इतिहासाचा अभ्यास कशासाठी करावा? त्याने विचार- क्षमता वाढते. ग्रंथवाचनाचें फल काय? त्यामुळे विचार करण्याची सवय लागते.