Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

इहवादी दृष्टिकोन । ७३

कार्यकारण भाव
 पण याहिपेक्षा, विष्णुशास्त्री यांची खरी विज्ञाननिष्ठा स्पष्ट दिसून येते ती त्यांच्या 'लोकभ्रम' या निबंधांतून. भुतेंखेतें, शकुन व फलज्योतिष यांविषयी त्यांनी जें विवेचन केलें आहे त्यावरून ग्रीक विद्येचें पुनरुज्जीवन झाल्यावर युरोपांत जें प्रबोधनयुग निर्माण झालें तेंच महाराष्ट्रांत निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता; याविषयी शंका राहत नाही. कार्यकारणभावाचा उदय हे प्रबोधनयुगाचें पहिले व प्रधान लक्षण होय. 'रॅशनॅलिझम इन् युरोप' या आपल्या ग्रंथांत लेकी या पंडिताने याचें उत्तम विवेचन केलें आहे. या कार्यकारण भावाचा संस्कार लोकमानसावर करावा हाच हे निबंध लिहिण्यांत शास्त्रीबुवांचा हेतु स्पष्ट दिसतो. शकुन-अपशकुन आणि त्यांची सांगितली जाणारीं फळें, आकाशांतील ग्रह व मानवाचें भवितव्य यांच्यांत कसलाहि कार्यकारणसंबंध नाहीं हें त्यांनी पुनः पुन्हा सांगितलें आहे व कोणत्याहि गोष्टीची सत्यासत्यता ठरवावयाची ती प्रत्यक्षप्रमाणाने ठरवावी, असा सारखा आग्रह चालविला आहे.
हा दीडशहाणा!
 सामान्यतः लोक गतानुगतिक असतात. एकाने मानलें म्हणून दुसरा मानतो, आणि मग शेकडो, हजारो लोक तेंच खरें मानून त्यावर अचल श्रद्धा ठेवतात; आणि त्याच्या विरुद्ध कोणीं कांही सांगितलें, तर हजारो लोक मानतात ते मूर्ख, आणि हाच काय तो शहाणा, असा युक्तिवाद करतात. असले युक्तिवादच प्रगतीच्या आड येत असतात. विष्णुशास्त्री म्हणतात, "आजपर्यंत साक्रेटीस, कोलंबस, ग्यालिलिओ, न्यूटन, बेकन, वॉट वगैरे जे मोठमोठे शोधक होऊन गेले त्या सर्वांशीं बाकीच्या अज्ञानग्रस्त जगाचें हेंच भांडण; 'आज हाच निघाला दीडशहाणा आम्हांस सांगायला, आजपर्यंत लोक झाले ते सगळे मूर्खच!" एकंदर लोकांची मोठी चूक दृष्टीस पडते की, एखाद्या गोष्टीचा खरेपणा तिच्या स्वरूपावरून न पाहतां ते नेहमी बहुमताकडे धांवत असतात. याचकरिता लोकशिक्षणाचा फैलाव होईल तेवढा देशास हितावहच होतो. त्याच्या योगाने लोकांचें भ्रमजाल तुटून सत्या- सत्याची निवड करण्याचें त्यांच्या अंगीं सामर्थ्य येऊ लागतें."
ज्ञानाचा प्रभाव
 हें सामर्थ्य ज्यांना नाही त्यांचीं मनें दुबळी झालेली असतात, त्यांना क्षीणत्व आलेलें असतें; आणि अशीं क्षीण मनाचीं माणसें ज्ञानसंपन्नापुढे सहजच हतप्रभ होऊन त्याची गुलाम होतात. कोलंबसाचें विष्णुशास्त्री यांनी दिलेलें उदाहरण फार उद्बोधक आहे. अमेरिकेजवळील एका बेटांतील आदिवासी लोक त्याच्याशीं थोडें उद्दामपणे वागूं लागले होते. त्या सुमारासच चंद्रग्रहण आलें होतें. कोलंबसाला तें माहीत होते; त्या आदिवासीजनांना अर्थातच हें ज्ञान नव्हतें. त्याचा फायदा घेऊन कोलंबसाने त्यांना धमकी दिली की, आज रात्रीं मी माझें सामर्थ्य तुम्हांला दाखवतों,