Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

७२ । केसरीची त्रिमूर्ति

आहे. त्या वेळी इंग्रज पंडित, मिशनरी व राज्यकर्ते यांनी भारताच्या प्राचीन परंपरेची, धर्माची व थोर पुरुषांची निंदा करण्याचा विडाच उचलला होता; आणि त्यामुळे हिंदी लोक मनाने खचून जाण्याचा फार संभव होता. ही आपत्ति ध्यानांत घेऊन शास्त्रीबुवांनी त्यांना उपदेश केला आहे की, "वरील निंदेने त्यांनी बिलकुल खचून जाऊं नये, आणि मेकॉलसारख्या मोठ्या नांवास न भितां व मिशनरी, पाद्री, बाटे यांच्या रांगास न जुमानतां आपल्या देशावर वरील लोकांनी जीं अज्ञानमूलक व दुराग्रहजन्य परोपरीचीं दूषणें दिलों आहेत, त्यांचें यथास्थित खंडन करावें." असें सांगून शेवटीं समारोप करतांना ते म्हणतात, "याप्रमाणे या मनोवृत्तीचा- गर्वाचा मनुष्यास अत्यंत उपयोग आहे. ही त्याचे ठायीं वास करीत नसेल तर मत्सरी व द्वेषी मनुष्याच्या निर्भत्सनेखाली तो तेव्हाच खचून जाऊन, त्याच्या अंगचे खरे गुणहि कदाचित् लोपून जातील."
 धन-संपत्ति, काम-क्रोधादि षड्विकार यांची प्राचीन धर्मवेत्त्यांनी, साधूंनी, संतांनी एकजात निंदा करून त्यांना मानवाचे शत्रु ठरविलें आहे. असे असूनहि विष्णुशास्त्री यांनी त्यांच्यावर ही टीका करून, या मनोवृत्तींची मनुष्याने योग्य मर्यादित का होईना, पण जोपासना केली पाहिजे, असें निर्भय प्रतिपादन केलें. यांतचं त्यांची विज्ञाननिष्ठ, इहवादी दृष्टि स्पष्ट दिसून येते.
धननिषेध अयोग्य
 धन-संपत्ति, पैसा, द्रव्य यांचा ख्रिस्ती धर्मानेहि हिंदु धर्माप्रमाणेच निषेध केला आहे. युरोपांतील धर्मंक्रांतीचे प्रणेते लूथर, काल्व्हिन, यांसारखे जे धर्मसुधारक त्यांनी कॅथॉलिक पंथाच्या या संपत्तिविषयक दृष्टीचा निषेध करून भांडवलाला, भांडवलदारीला, व्यापाराला व सर्व आर्थिक उद्योगांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली नसती, तर युरोपांत औद्योगिक क्रान्ति झालीच नसती. कॅथॉलिक धर्माला व्याजबट्टा मंजूर नाही. त्यामुळे सावकारीचा सर्व धंदा प्राधान्याने ज्यू लोकांच्या हातीं होता. त्यांना खिस्ती धर्म-बंधने लागू नव्हती. अर्थशास्त्र व भौतिक विज्ञान यांची वाढ युरोपांत अठराव्या शतकांत झाली. तेव्हा शेती हा धंदा श्रेष्ठ व कारखानदारी, व्यापार हे हीन व्यवसाय होत हा सिद्धान्त पदभ्रष्ट झाला. प्रॉटेस्टंट पंथाचा एक अध्वर्यु जीन काल्व्हिन याला त्याच्या चरित्रकाराने भांडवलशाहीच्या विकासाचें श्रेय दिलें आहे. कारण त्याने सावकारी, व्यापार, कारखाने, पेढी या उद्योगांना नैतिक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. पुढील शतकांत विज्ञानाने तिलाच दृढता आणली व म्हणूनच युरोपच्या आर्थिक प्रगतीचा पाया घातला गेला. संपत्तीविषयीची हीच नवी दृष्टि विष्णुशास्त्री यांना आपल्या समाजांत रूढ करावयाची होती, असें 'संपत्तीचा उपभोग' या निबंधावरून दिसतें. ते दीर्घकाल जगते तर या विषयावर त्यांनी निश्चित ग्रंथरचना केली असती.