पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

इहवादी दृष्टिकोन । ७१

अवलंबून आहे. म्हणून तीं बुडाल्याचें अपेश तिच्यावर घालणे बरोबर नव्हे." या संपत्तीच्या विवेचनांतील एका वाक्यावरून विष्णुशास्त्री यांची इहवादी दृष्टि स्पष्ट दिसून येते. ते म्हणतात. "धर्माच्या व नीतीच्या आड न येतां परमेश्वराने सुखाचे जे हजारो पदार्थ या पृथ्वीवर निर्माण केले आहेत त्यांचें सुख घेणें, हें अगदी रास्त आहे. फार तर काय, आपल्या शास्त्राप्रमाणे असें करणें हें तिसऱ्या पुरुषार्थाचें साधन करणें होय." मानवाच्या ऐहिक सुखाविषयी हाच विचार पुढे आगरकरांनी जास्त सविस्तर मांडला आहे. ऐहिक सुखाविषयीची ही दृष्टि अगदी अर्वाचीन आहे.
काम-क्रोध - मित्र
 संपत्तीचा प्राचीन तत्त्ववेत्त्यांनी निषेध केला आहे म्हणून त्यांच्यावर विष्णुशास्त्री यांनी टीका केली ती सौम्य आहे; पण त्यांनी काम-क्रोधादि विकारांना षड्रिपु म्हटलें व त्यांची निंदा केली म्हणून शास्त्रीबुवांनी जी टीका केली आहे ती अगदी प्रखर आहे. ते म्हणतात, "परमेश्वराने मनाच्या ज्या निरनिराळ्या शक्ति निर्माण केल्या आहेत व त्यांस निरनिराळ्या वृत्ति जडविल्या आहेत, त्यांस अहेतुक किंवा अनर्थावह म्हणणें हें धर्माच्या दृष्टीने पाप व न्यायाच्या दृष्टीने मूर्खत्व होय." या विकारांचा विचार करतांना त्यांनी त्यांना घोड्याची उपमा दिली आहे. "बसणारा जर चतुर असेल तर त्याचा हवा तसा उपयोग करून घेता येतो; पण तो जर कच्चा असेल तर घोडा त्यास खड्ड्यांत नेऊन टाकील. तेंच काम-क्रोधादि षड्विकारांचें आहे. तेव्हा हे सहा जण जगाचे केवळ शत्रूच आहेत असें नाही. उलट असेंहि म्हणतां येईल की, ते जगाचे हितकर्ते मित्रहि पण आहेत; या वृत्ति अनर्थकारक नाहीत. त्यांपासून मनुष्यास फार उपयोग आहे. इतकेंच मात्र की, त्यांस मनुष्याने नेहमी स्वाधीन ठेवून त्यांस आपण सर्वथा वश कधीहि होतां कामा नये."
 षड्विकारांसंबंधीचें हें विवेचन 'गर्व' या निबंधांत आलें आहे. त्यांत प्रामुख्याने गर्व, अभिमान, अहंता या मनोवृत्तीचेंच विवेचन आहे; व त्याचा निष्कर्षहि असाच आहे. श्रीमंती, रूप इत्यादिविषयीचा गर्व हा दोषरूपच होय; पण थोर पुरुषांनी आपल्या गुणांचा गर्व वाहिला तर तो दोषावह न होता उलट शोभादायकच होतो. मौजेची गोष्ट अशी की, शोभादायक गर्वाचीं, आत्मस्तुतीचीं उदाहरणें देतांना विष्णुशास्त्री यांनी मिल्टन, वर्डस्वर्थ, भवभूति, जगन्नाथपंडित अशा कवींची उदाहरणें तर दिलीं आहेतच; पण त्यांच्या जोडीला परम भगवद्भक्त जे तुकाराम त्यांचेंहि उदाहरण दिले आहे. "तोवरी तोवरी माळामुद्राभूषण । जंवतुक्याचें दर्शन झालें नाही ॥" "तुका म्हणे आता उरलों उपकारापुरता ।" या त्यांच्या वचनांवरून थोर पुरुषांना गर्व ही वृत्ति शोभादायकच ठरते, हें विष्णुशास्त्री यांचें म्हणणें यथार्थ वाटतें.
गर्वाचे महत्त्व
 या विकारांचा मनुष्याला फार उपयोग आहे, फार उपयोग आहे, असें या निबंधांत वारंवार म्हटलें आहे आणि त्यांच्या स्वतःच्या काळचेंच उदाहरण दिलें