७० । केसरीची त्रिमूर्ति
लोकांस रक्तपात, राज्यांच्या घडामोडी वगैरे गोष्टींची वर्णने करून नरस्तुति गात बसण्याचा कंटाळा असल्यास नवल काय?"
निवृत्ति, परमार्थप्रवणता, इहविमुखता हा विषय मोठा आहे. ती समाजाच्या ऱ्हासास कशी कारण होते याचें विवेचन करण्यास मोठा ग्रंथच लिहावयास हवा. (लो. टिळकांनी पुढे तो लिहिलाच.) त्या दृष्टीने पाहतां हें वरील विवेचन अगदी स्वल्प आहे. खरें म्हणजे तें विवेचन नाहीच. मनांत आलेला विचार त्यांनी मांडला इतकेंच; पण या निवृत्तिमार्गांतील संपत्तीची निंदा व काम-क्रोध-मद-मत्सरादि षड्रिपूंचा निषेध ही जीं प्रधान तत्त्वें, त्यांविषयी विष्णुशास्त्री यांनी जें सविस्तर विवेचन केलें आहे त्यावरून, निवृत्ति हें आपल्या समाजाचें फार मोठे व्यंग आहे, ती एक मोठी व्याधी आहे, असें त्यांचें मत होतें, याविषयी शंका राहत नाही.
धन - एक शस्त्र
'संपत्तीचा उपभोग' आणि 'गर्व' या निबंधांत, या दोन गोष्टींविषयी जुन्या तत्त्ववेत्त्यांचे जे विचार आहेत त्यांवर शास्त्रीबुवांनी अगदी परखड टीका केली आहे. संपत्ति, धन, लक्ष्मी यांविषयी प्राचीन महाज्ञानी पुरुष, थोर तत्त्ववेत्ते यांची मतें काय होतीं तें सांगतांना त्यांनी "मूढ जहीहि धनागमतृष्णाम्" इत्यादि वचनें देऊन खुद्द शंकराचार्यांचेच विचार मांडले आहेत. आणि एवढा मोठा प्रतिपक्षी समोर स्वतःच उभा करून, त्याचीं मतें एकदेशीय आहेत, असें आपलें मत स्वच्छ सांगितलें आहे. अनेक प्रमाणें देऊन त्यांनी असें दाखवून दिलें आहे की, दुराचार, मदांधता इत्यादि संपत्तीपासून होणारे जे अनर्थ त्यांचा संपत्तीशी कार्यकारणरूप संबंध कांही नाही. मोठी राजसत्ता भोगीत असतांहि या विकारांपासून मुक्त असलेल्या राजरत्नांचीं आपल्या इतिहासांत अनेक उदाहरणे आहेत; आणि संपत्तीपासून जसे अनर्थ होतात तसे अनेक लाभहि होतात! तें एक शस्त्र आहे. त्याच्यापासून लाभ किंवा हानि होणें सर्वस्वी त्याच्या मालकावर अवलंबून आहे. यास्तव संपत्तीची स्तुति किंवा निंदा दोन्ही व्यर्थं होत.
धन - पुरुषार्थसाधन
जें व्यक्तीच्या बाबतींत तेंच राष्ट्राच्या बाबतींत. राष्ट्रांत संपत्ति फार झाली म्हणजे त्याच्या ऱ्हासास प्रारंभ झालाच म्हणून समजावें, असें मत गेल्या (अठराव्या) शतकाच्या अखेरपर्यंत रूढ होतें. 'ऋद्धिः चित्त विकारिणी ।' हें वचन प्रसिद्धच आहे; पण शहाणा जो आहे तो जसा धनाने मदांध होऊन जात नाही, त्याचप्रमाणे ज्या राष्ट्राची राज्यरीति उत्कृष्ट आहे, त्यास धनाची समृद्धि कांहीहि अपाय न करतां, उलटी, अधिकच बलाढ्य करते. यास उदाहरणें अलीकडचीं इंग्लंड, फ्रान्स, प्रशिया इत्यादि राज्यें व प्राचीन काळचीं रोम, कार्थेज हीं राज्ये होत. हीं उदाहरणें सविस्तर देऊन शेवटीं शास्त्रीबुवांनी निष्कर्ष सांगितला आहे की, "संपत्तीची विपुलता ही उत्कर्षास किंवा अपायास कारण होणें हें राज्यांच्या अंगच्या मजबुतीवर