पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अवनतीची मीमांसा । ५७

युरोपएवढा हिंदुस्थानचा विस्तार आहे. आणि युरोपमध्ये तेवढ्या प्रदेशांत एकोणीस राष्ट्र आहेत तर हिंदुस्थानांत एकच आहे. शिवाय या देशांत अनेक धर्मपंथ, अनेक जाति, अनेक चालीरीति आहेत. येथे हिंदूंखेरीज फिरंगी, हबशी, रोहिले, पारशी, शीख अशा अनेक भिन्न जमाती असून त्यांच्या विवाहपद्धति, रीतिभाती, आहार-विहार अतिशय भिन्न आहेत. असे हे भिन्न समाज या अत्यंत विस्तीर्ण प्रदेशांत पसरलेले आहेत आणि हा विस्तारच या देशास बाधक झाला आहे. हें सांगून पुढे विष्णुशास्त्री यांनी इंग्लंड, तुर्कस्थान, प्राचीन ग्रीस यांची उदाहरणें देऊन, देश लहान, आटोपशीर असला म्हणजे त्यांतील लोक संघटित, एकरूप होऊ शकतात आणि म्हणूनच ते पराक्रम करूं शकतात, असें दाखविलें आहे. आणि हिंदुस्थानांत छपन्न देश, छपन्न भाषा, शेकडो जाति, शेकडो धर्म, शेकडो आचार- इतक्यांत एकोपा व्हावा कसा, असा प्रश्न विचारला आहे. याच विवेचनांत इतर देशांच्या इतिहासांतली आणखी उदाहरणें देऊन, आटोपशीर राज्यांत जी बळकटी असते ती मोठ्यांत असत नाही, अतिविस्तार राज्यास अपायकारकच होतो, असा सिद्धान्त त्यांनी मांडला आहे व हिंदुस्थानच्या सांप्रतच्या ऱ्हासास तेंच कारण आहे, असें मत मांडले आहे.
हेत्वाभास
 विष्णुशास्त्री यांच्या या प्रतिपादनांत अनेक हेत्वाभास आहेत. हिंदुस्थान देश अतिविस्तीर्ण असला तर तो प्राचीन काळापासून तसाच आहे. असे असूनहि त्या प्राचीन काळीं तें विस्तीर्णत्व पराक्रम, कर्तृत्व, यांच्या आड आलें नाही, अपायकारक ठरले नाही. व्यास, वाल्मीकि, कालिदास, पाणिनि, यास्क, पतंजली, राम-कृष्ण, विक्रमादित्य, शिवछत्रपति, बाजीराव, रणजितसिंग, अहिल्याबाई, लक्ष्मीबाई, यांचीं उदाहरणें स्वतः विष्णुशास्त्री यांनीच दिली आहेत. शक, यवन, हूण, युएची, यांच्यासारख्या परकीय रानटांची दहा-बारा आक्रमणे या देशावर आली. त्यांचे निर्दालन करून त्या सर्व जमातींना हिंदु समाजांत सामील करून टाकण्याचा अनेक वेळा हिंदूंनी विक्रम केला, तो याच काळांत. या देशाचा प्रचंड विस्तार जर आड आलाच असला, तर तो सर्व हिंदुस्थानावर एकछत्री साम्राज्य स्थापण्याच्या मार्गांत आला असेल. तरीहि चंद्रगुप्त, अशोक यांनी अखिल भारतावर त्या काळांत साम्राज्य स्थापन केलें होतेंच. आणि त्यानंतरहि सातवाहन, गुप्त, राष्ट्रकूट यांनी अखिल भारतावर नसली तरी, खूप मोठ्या विस्तारावर सत्ता स्थापिली होतीच; पण या मुद्याला तितकें महत्त्व नाही. अखिल युरोपवर एकछत्री सत्ता कधीच कोणाची नव्हती. तरी इंग्लंड, फ्रान्स, इटली, जर्मनी या देशांनी पराक्रम केलेच. त्याचप्रमाणे भारतांतहि पल्लव, कदंब, वाकाटक, प्रतिहार, सेन, चालुक्य, यादव इत्यादि राज्यांनी पराक्रम करून विद्या कलांची जोपासना इसवी सनाच्या दहाव्यां शतकापर्यंत केलीच होती. तेव्हा विस्तीर्णत्व आणि कर्तृत्व, प्रगति, पराक्रम, स्वातंत्र्य,