५६ । केसरीची त्रिमूर्ति
कायम असतो. एखाद्या वृक्षाच्या मुळालाच कीड लागली की तो वठत जातो. मग कितीहि उपचार केले तरी त्याला पुन्हा टवटवी येण्याची आशा नसते. ही शाश्वत निकृष्ट अवस्था. पण त्याचा फुलौरा, त्याच्या फांद्या, पल्लव कांही वेळा छाटले जातात, किंवा वणव्यांत सापडल्याने जळून जातात, तरी त्या वेळी त्याच्या अंतरीचें सत्त्व कायम असतें. ही नैमित्तिक निकृष्टावस्था होय. ही फार काळ टिकत नाही. थोड्याच वेळांत तो वृक्ष पुन्हा पहिल्यासारखा किंवा आणखी भराने वाढून फळा-फुलांनी बहरून जातो. हिंदुस्थानची सध्याची निकृष्ट अवस्था या दुसऱ्या प्रकारची आहे. छत्रपति संभाजी यांच्या मृत्युसमयीं आणि पानपतच्या पराभवाच्या वेळीं महाराष्ट्राला अशी स्थिति आली होती; पण थोड्याच वेळांत अपूर्व पराक्रम करून हे राष्ट्र उन्नत स्थितीला आलें. "हिंदुस्थानाविषयी हेंच निदान विष्णुशास्त्री यांनी केलें होतें; साधारण पौष्टिकाचे उपचार त्याजवर सुरू केले असतां तो पुन्हा पहिल्यासारखा सशक्त व तेजस्वी होईल. त्यासाठी शस्त्रक्रियेसारख्या जालीम उपायांची मळीच गरज नाही, असें त्यांनी म्हटलें आहे.
आम्हीच जबाबदार
विष्णुशास्त्री यांच्या अगोदरचे पंडित आणि विशेषतः लोकहितवादी व रानडे यांच्या मतें प्राचीन काळी, ऋषींच्या कारकीर्दीत हा देश उन्नत अवस्थेला पोचला होता, ऐश्वर्यसंपन्न होता; पण पुढे आमच्या धर्माला विकृतरूप आलें. आमचें बुद्धिप्रामाण्य जाऊन तेथे शब्दप्रामाण्य आलें. आम्ही विद्याविमुख झालों. वर्ण-जाति यांतील विषमता फार वाढली. स्त्री-जीवनाला पराकाष्ठेची अवकळा आली. अन्याय, जुलूम, पक्षपात, अनीति, भ्रष्टता फार वाढली, आणि यामुळे हिंदु समाजाला हीन दशा प्राप्त झाली. याचा अर्थ असा की, आमच्या अवनतीला आमचे आम्हीच जबाबदार आहों. आमच्या मूर्खपणामुळेच आमचें वैभव, आमचें स्वातंत्र्य यांचा लोप झाला.
विष्णुशास्त्री यांना हे मत बिलकुल मान्य नाही. आमचा धर्म बिघडला आहे, नीति सुटली आहे, मूळचे चांगले आचार जाऊन वेडगळ रीतिभाति आम्हांस लागल्या आहेत, या विधानांना ते कोट्या म्हणतात. त्या बड्या बड्या मंडळींनी ही उपपत्ति केवळ इंग्रज लोकांच्या प्रलापांवरून बसविली आहे, असें त्यांना वाटतें. मग असा प्रश्न येतो की, सध्याची जी अवदशा या देशाला आली आहे ती कशामुळे ? नैमित्तिक का होईना, पण आपल्याला निकृष्ट दशा आली आहे हें विष्णुशास्त्री यांना मान्य आहे. मग ती का आली? त्यांची उपपत्ति काय आहे ?
विस्तीर्णत्व
या देशाचें विस्तीर्णत्व आणि प्राचीनत्व हीं दोन कारणें त्याच्या ऱ्हासाला कारणीभूत आहेत, असें विष्णुशास्त्री यांचें मत आहे. रशिया वगळून राहिलेल्या