३४० । केसरीची त्रिमूर्ति
या दोन थोर पुरुषांचा मतभेद होता असे नाही; पण असे असले तरी प्रत्यक्ष व्यवहारांत या तत्त्वांचा आचार करतांना, परस्परांच्या मर्यादांचा प्रश्न उद्भवला आणि त्यांतूनच संघर्ष निर्माण झाला.
भारताला स्वातंत्र्य प्राप्त करून घ्यावयाचें तें लोकशक्तीच्या साह्याने घ्यावयाचे असा टिळकांचा निश्चय होता. लोकशाहीला व्यक्तिस्वातंत्र्य अपरिहार्यच असते; पण व्यक्तींना असें स्वातंत्र्य प्राप्त झालें की त्यांची संघटना दुष्कर होऊन बसते. टिळकांना ही सतत चिंता होती. त्यांच्या डोळ्यांदेखत नवीनच स्वतंत्र झालेले लॅटिन अमेरिकेतील मेक्सिको, अर्जेंटिना, ब्राझील, हे जे देश त्यांच्या लोकशाहीची परवड होत होती. उलट जपान, जर्मनी यांनी मर्यादित लोकशाहीच्या आश्रयाने स्वतःची राष्ट्रें बलसंपन्न केली हें त्यांना दिसत होते. त्यामुळे जुनीं बंधने तोडतांना आधी नव्या बंधनाची व्यवस्था केली पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. सामाजिक सुधारणा करतांनाहि हजार-पांचशे लोकांनी मंडळी किंवा सभा स्थापून, नवीं बंधनें स्वीकारून ती करावी, असें ते म्हणत. असे केलें नाही तर समाज विघटित होईल अशी भीति त्यांना वाटे. म्हणून एकट्या व्यक्तीने उठून कांही एकांतिक प्रतिपादन व आचार करूं नये, असें ते सांगत.
आगरकरांची रीत याहून निराळी होती. रूढ लोकमताहून भिन्न असे कोणतेहि विचार, अत्यंत क्रान्तिकारक, अगदी ध्रुवभिन्न विचारहि प्रतिपादण्यास अर्थ आहे, त्याचाहि उपयोग आहे, असें त्यांना वाटे. त्याचप्रमाणे आचाराच्या बाबतींतहि व्यक्तीला पूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे, असें त्यांचे मत होतें. आणि तसे ते आवेशाने मांडीतहि.
माझ्या मतें या दोन्ही वृत्ति, या दोन्ही रीति समाजसुधारणेला अवश्य असतात. अनेक शतके अंधधर्माचें व रूढींचें वर्चस्व असलेला समाज इतका हेकट, दुराग्रही व बधिर झालेला असतो, त्याची कातडी इतकी जाड झालेली असते की, अत्यंत तीक्ष्ण, धारदार आणि भेदक भाल्यांच्या प्राहारांवांचून त्याच्या अंतरंगापर्यंत पोचण्यास दुसरा मार्गच नसतो. म्हणूनच आगरकरांनी तसे प्रहार केले; पण अशाने सर्वच बंधनें तुटून समाज स्वैर होऊ नये म्हणून लोकसेवा करून, लोकांना सीम्य उपदेश करून, त्यांच्या कलाने घेऊन, त्यांच्यापासून फार दूर न जातां, एकदोन पावलेंच पुढे टाकून लोकमतांत हळूहळू परिवर्तन करणारा नेता हाहि अवश्य असतो. टिळकांनी हा दुसरा मार्ग स्वीकारला.
दोनच पावले
पण या दोन्ही रीति समाजसुधारणेस अवश्य आहेत, असें टिळकांचेंहि मत असावें असें वाटतें. महात्मा गांधींचा उदय झाला व त्यांनी सत्याग्रहाची व कायदेभंगाची मोहीम सुरू केली. वास्तविक हा मार्ग टिळकांनीच १९०७ साली आखलेला होता. पण या वेळी ते महात्माजींच्या चळवळींत सामील झाले नाहीत. कां?