Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/३५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सिंहावलोकन । ३३९

करून मेली त्यांच्या दुःखाबरोबर तें येणार नाही, अशी आमची खातरी आहे." (निबंधसंग्रह, भाग ३ रा, पृ. ११५-१६ उतारा: 'आधुनिक भारत'- आचार्य जावडेकर, पृ. १५१).
अद्वैत
 लो. टिळक तरी यापेक्षा निराळें काय म्हणत होते? तेव्हा सामाजिक व राजकीय सुधारणांच्या आवश्यकतेविषयी, इतकेंच नव्हे तर त्यांच्या अग्रक्रमाविषयीहि टिळक-आगकरांत मूलतः मतभेद नव्हतें, हें आपण ध्यानांत घेतलें पाहिजे. तत्कालीन परिस्थिति, कांही स्वभाव-गुण, त्या सुधारणांचे मार्ग, त्यांच्या मर्यादा यांमुळे त्या काळीं संघर्ष झाला. तो सर्व विसरून त्रिमूर्ति ही एकजीव त्रिमूर्ति होती, हें ध्यानीं घेऊन त्यांच्या प्रकृति निराळ्या असल्या तरी, त्रिगुणातीत होऊन आपण त्यांचे अद्वैतच लक्षांत घेतलें पाहिजे.
 विष्णुशास्त्री यांनी भारतांत राष्ट्रीय अहंकार, राष्ट्रीय अस्मिता जागृत केली. या जाणिवेवांचून कोणतीहि नवी सष्टि निर्माण होत नाही. एकंदर, विश्वरचनेंतहि प्रथम अहंकार- म्हणजे मी पृथक् आहे, स्वतंत्र आहे, श्रेष्ठ आहे, अनन्यसामान्य आहे ही जाणीव स्फुरावी लागते. जें एकंदर विश्वरचनेंत आहे तेंच मानवी सृष्टींत आहे. कोणताहि समाज, कोणतेंहि राष्ट्र, कोणतीहि संस्था यांच्या निर्मितीसाठी, ही पृथक्त्वाची जाणीव अवश्य असते. म्हणूनच ही जाणीव, हा अहंकार भारतीयांच्या ठायीं जागृत करण्यास विष्णुशास्त्री यांनी प्रारंभ केला.
व्यक्तित्व आणि संघटना
 हा अहंकार हा राष्ट्ररचनेचा पाया होय. त्यावर मंदिर उभारण्यापूर्वीचं विष्णुशास्त्री निघून गेले; आणि टिळक-आगरकर यांच्या शिरावर ती जबाबदारी आली. त्यांनी तें कार्य कसें केलें? या अहंकारामुळे समाजांत, प्रत्येक व्यक्तीच्या ठायीं प्रथम व्यक्तित्व जागृत व्हावें लागतें. तें जागृत झालें तर व्यक्ति निर्माण झाली असें होतें; आणि अशा व्यक्तित्वसंपन्न लोकांना संघटित केलें, त्यांच्या भिन्न अहंकारांची राष्ट्रीय अहंकारांत परिणति झाली की राष्ट्र निर्माण होतें. तेव्हा अस्मिता जागृत झाल्यावर प्रथम व्यक्ति निर्माण करणें आणि मग या व्यक्तींना संघटित करणे ही दोन कार्ये राष्ट्रनिर्मितीसाठी करणें अवश्य असतें.
 यांपैकी व्यक्तिनिर्मितीवर आगरकरांनी भर दिला; आणि संघशक्तिनिर्मितीवर टिळकांनी भर दिला.
 ह्या दोन कार्यामध्ये विरोध आहे काय? मुळीच नाही. त्या दोघांच्याहि मनांत तसें नव्हतें. व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करतांना, समाजाचें, कुशल राहील इतकीं बंधनें ठेवली पाहिजेत असें आगरकर नेहमी म्हणत; आणि संघशक्तीचें महत्त्व प्रतिपादीत असतांना, जेथे व्यक्तिस्वातंत्र्य नाही तो समाज पशूंचा होय, असें टिळक सांगत असत. तेव्हा स्वातंत्र्य व संघटना ह्या दोन्ही बाबतींत तात्त्विक दृष्टीने मुळांतच