Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/३५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सिंहावलोकन । ३४१

अखिल भारतीय काँग्रेसने तसा ठराव केल्यावाचून त्या चळवळींत पडावयाचें नाही, असें त्यांनी ठरविलें होतें. कारण लोकांच्यापुढे दोनच पावलें जावयाचें असें त्यांचे धोरण होतें. पण तरीहि महात्मा गांधींनी त्या मार्गाने अवश्य जावें, असेंहि त्यांनी सांगितलें होतें. ते म्हणाले होते, "तुम्हांला या कार्यात यश येवो. जर तुम्हांला लोकांना आपल्याकडे वळवितां आलें, तर मी तुम्हांला उत्साहाने पाठिंबा देईन."
 यावरून आगरकरांच्या रीतीला, स्वतः ती स्वीकारावयाची नाही, असें निश्चित्त ठरले असूनहि, टिळकांचा मनोमन पाठिंबा असावा असें वाटतें. तेंव्हा एकाच अहंकाराची भिन्न रूपें घेऊन प्रगट झालेली ही केसरीची त्रिमूर्ति होती यांत शंका नाही.
सिंहनाद
 या ग्रंथाच्या अगदी आरंभी कैसरीच्या त्रिमूर्तीच्या आधीचे जे नेते त्यांच्या कार्याचें स्वरूप आपण पाहिलें. नंतर ग्रंथामध्ये त्रिमूर्तीच्या कार्याचे विवेचन केलें. आणि आता शेवटीं त्यांच्या कार्याचें वैशिष्ट्य काय याचा विचार केला. त्यावरून असे दिसून येईल की, पहिल्या पिढीच्या नेत्यांनी नवें तत्त्वज्ञान सांगून येथे ज्या नव्या प्रेरणा दिल्या होत्या त्यांमुळे भारतीय जीवनांत नवीं स्पंदनें, नव्या अस्फुट नादलहरी उत्पन्न होऊ लागल्या होत्या; पण गिरिशिखरें हादरून टाकील, ब्रह्मकटाह भेदून गगनाला जाऊन भिडेल असा सिंहनाद त्यांतून निर्माण होत नव्हता. तो त्रिमूर्तीच्या केसरीने भारतांत निर्माण केला. या नादाच्या प्रचंड लहरींनी पृथ्वी आणि आकाश गर्द भरून गेलें. त्या तुमुल घोषाने आंग्ल राष्ट्राच्या हृदयाचें विदारण केलें आणि भारतीय जनतेच्या मनांत नवे कंप निर्माण केले. त्या कंपांमुळे तिला नवी चित्कळा लाभली; आणि तिच्या सामर्थ्याने राष्ट्रपदवीवर आरूढ होऊन तिने स्वातंत्र्याचा लाभ करून घेतला.
 "आज भारतांत तसाच सिंहनाद आपण निर्माण करावा," अशी केसरीच्या त्रिमूर्तीची मी मनोभावें प्रार्थना करतों.