Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/३४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सिंहावलोकन

हें स्पष्ट केलें आहे. त्यावरून नागरित्वास अवश्य त्या गुणांची जोपासना ते करीत होते, यांत शंकाच नाही. मग त्यांचेच कार्य या त्रिमूर्तीने पुढे चालविलें का स्वतःची कांही निराळी भर त्यांत घातली, निराळा पंथ, निराळी परंपरा, निर्माण केली, असा प्रश्न येतो. येथवर केलेलें विवेचन ध्यानीं घेतलें तर या त्रिमूर्तीने स्वतःची निराळी परंपरा निर्माण करून कालप्रवाह बदलून टाकला हे सहज लक्षांत येईल.
स्वावलंबन
 स्वावलंबन हा या निराळ्या परंपरेचा पहिला विशेष होय. राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक इत्यादि सर्व क्षेत्रांत आपल्या उत्कर्षाचे प्रयत्न आपणच केले पाहिजेत, इंग्रज सरकार, इंग्रज अधिकारी, इंग्रज पंडित, येथे आलेले पाश्चात्त्य मिशनरी यांचें या बाबतींत कसलेंहि साह्य होणार नाही, असा त्यांचा निश्चित सिद्धान्त होता. आधीच्या थोर नेत्यांची धारणा बरोबर याच्या उलट होती. ते इंग्रजांना गुरु मानीत असत. त्यांचें राज्य हें ईश्वरी वरदान आहे, असें त्यांना वाटे; आणि सर्व क्षेत्रांत ते आपल्या या अजाण देशाला हातीं धरून चालवितील, अशी त्यांची श्रद्धा होती. येथे जुलूम होतो, अन्याय होतो हें त्यांना दिसत होतें. तसें ते बोलूनहि दाखवीत; पण इंग्लंडमध्ये जाऊन, तेथे राहणारे भारताचे जे खरे राज्यकर्ते त्यांना गाऱ्हाणी सांगितलीं, येथल्या परिस्थितीची कल्पना दिली, की ते या सर्व गैर प्रकाराला आळा घालतील, असें त्यांना वाटे. या त्रिमूर्तीची मात्र अशी निश्चिति होती की इंग्रज लोक हे पूर्ण स्वार्थी आहेत, या देशाची लूट करणें यापलीकडे त्यांचा दुसरा कोणताहि हेतु नाही आणि या देशाच्या हिताची जी जी गोष्ट असेल तिच्यावर बिब्बा घातल्याखेरीज ते मुळीच राहणार नाहीत. म्हणूनच विष्णुशास्त्री यांनी जाहिरपणे लोकांना सांगून टाकलें की, "इंग्रज येथे आले नसते तर, इतकेंच नव्हे तर इंग्रज जगांतच नसते तरी, आमचें कांही अहिंत झालें असतें असें नाही!"
 अर्थात् स्वावलंबनाखेरीज तरणोपाय नाही हें ओघानेच आलें. काँग्रेसचे मूळ प्रवर्तक जे ह्यूमसाहेब ते स्वदेशी परत जावयास निघाले तेव्हा येथल्या नेत्यांची काय अवस्था झाली हें मागे वर्णिलेच आहे. यापुढे काँग्रेस इंग्लंडमध्ये भरवावी असा त्यांनी चक्क ठराव केला! यावरून ते किती परावलंबी, किती आत्मप्रत्ययशून्य होते हे ध्यानांत येईल. अशा वृत्तीतून नागरिक कसे निर्माण होणार? राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणारी जी संस्था तिची जबाबदारी अंगावर घेण्यास जो कचरतो तो नागरिक कसला? तो सर्व उत्कर्षापकर्षाची जबाबदारी कशी घेणार? या परावलंबी वृत्तीचा आगरकर-टिळकांना संताप आला आणि त्यांनी तिचा कडक शब्दांत निषेध केला, यांतच त्यांचें वैशिष्ट्य दिसून येतें.
 असली परावलंबी, आत्मप्रत्ययशून्य वृत्ति नष्ट व्हावी, आणि प्रत्येक बाबतींत येथला समाज स्वावलंबी व्हावा यासाठीच या त्रिमूर्तीने राष्ट्रीय शिक्षणाचा अट्टाहास