Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/३४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३३४ । केसरीची त्रिमूर्ति

चालविला होता. सरकारी नोकरी सोडून देऊन विष्णुशास्त्री यांनी पहिला उद्योग हातीं घेतला तो हाच. 'राष्ट्रीय शिक्षण!' आणि राष्ट्रनिर्मितीसाठी त्याची किती आवश्यकता आहे हें पूर्णपणे जाणल्यामुळेच टिळक व आगरकर त्यांना तत्काळ येऊन मिळाले. इंग्रज सरकारने शाळा स्थापिल्या होत्या. विद्यापीठांचीहि स्थापना केली होती. शिक्षणाचा प्रसारहि चालविला होता; पण शिक्षणक्षेत्रांतलें हें परावलंबन त्रिमूर्तीला मुळीच मान्य नव्हतें. कारण त्या शाळांतून सरकारी शिक्षक स्वत्वशून्य शिक्षणच देणार. म्हणून याहि क्षेत्रांत आपण पूर्ण स्वावलंबी झालें पाहिजे, अशा निर्धाराने त्यांनी 'न्यू इंग्लिश स्कूल' या पूर्ण राष्ट्रीय व स्वतंत्र शाळेची स्थापना केली. लो. टिळकांनी अखेरपर्यंत राष्ट्रीय शिक्षणाचा आग्रह का धरला होता, स्वदेशी- बहिष्काराइतकेंच राष्ट्रीय शिक्षण महत्त्वाचें आहे, स्वराज्याचा तो पायाच आहे, असें तें का म्हणत, हें यावरून ध्यानांत येईल.
 आर्थिक क्षेत्रांतील स्वावलंबनाचा तर प्रश्नच नव्हता. इंग्रज सरकार या देशाचा, येथल्या कष्टकरी जनतेचा रक्तशोष करीत आहे हा सिद्धान्त तर दादाभाईंनीच मांडला होता. संरक्षित व्यापाराचा सिद्धान्त न्यायमूर्ति रानडे यांनी मांडला होता. पण असे असूनहि स्वदेशी- बहिष्काराला त्यांनी कधी पाठिंबा दिला नाही. १८७५ सालापासून सार्वजनिक काका स्वदेशीचा पुरस्कार व आचार करीत होते. बहिष्काराचा मार्ग टिळक, केसरी-मराठ्याच्या प्रारंभापासून सांगत होते, पण न्यायमूर्तीना तो कधी पटला नाही. उलट परदेशी भांडवलाचे ते गोडवे गात. तें भांडवल येथून लुटून नेलेल्या पैशांतूनच येत असे. पण ती लूट आहे, हेंच न्यायमूर्तीना मान्य नव्हतें. त्या भांडवलासाठी आपण ब्रिटिश भांडवलदारांचें ऋणी असले पाहिजे असें ते म्हणत. उलट समाईक भांडवल उभारून आपले कारखाने आपण काढले पाहिजेत, आपला व्यापार आपण हातीं घेतला पाहिजे, असें टिळक-आगरकर प्रारंभापासून प्रतिपादित होतें. त्रिमूर्तीची स्वावलंबी वृत्ति ती हीच होय. ब्रिटिश हे या देशाचे शत्रु आहेत, आपल्या मालाची बाजारपेठ म्हणून तें हिंदुस्थानकडे पाहतात, ते एकवेळ राज्य सोडतील पण व्यापार सोडणार नाहीत, हें त्यांनी पक्केपणीं जाणलें असल्यामुळेच त्यांनी तिचा अवलंब व पुरस्कार चालविला होता.
 राजकीय क्षेत्रांतील स्वावलंबन हा तर त्रिमूर्तीच्या कार्याचा प्राणच होता. विष्णुशास्त्री लवकर कालवश झाले म्हणून त्यांना आपलें तत्त्वज्ञान सविस्तर मांडतां आले नाही. पण त्यांच्या सर्व लिखाणाचा आत्मा तोच होता. अमेरिकेत क्रान्ति झाली तशी येथे होईल, असें जॉनसनच्या चरित्रांत त्यांनी सूचित केलेच होतें. आगरकरांचे राजकीय विचार हळूहळू याच वळणावर येत होते. टिळकांच्या स्वराज्याच्या राजनीति शास्त्राची सविस्तर चर्चा आपण केलीच आहे. स्वदेशी, बहिष्कार, साराबंदी, करबंदी हे स्वावलंबनाचे सर्व मार्ग नवा पक्ष स्थापितांना त्यांनी विवरून सांगितले होते.