-११-
सिंहावलोकन |
एक ध्येय
विष्णुशास्त्री चिपळूणकर, आगरकर आणि टिळक यांच्या तत्त्वज्ञानाचें व कार्याचें येथवर विवेचन केलें. त्यावरून हें ध्यानांत येईल की या त्रिमूर्तीचें तत्त्वज्ञान हे स्वातंत्र्याचें व राष्ट्रनिर्मितीचें तत्त्वज्ञान होतें. त्या तिघांत इतर अनेक बाबतींत कितीहि मतभेद असले तरी याविषयी त्यांच्यांत मुळीच मतभेद नव्हते. तेव्हा स्वतंत्र राष्ट्राची निर्मिति हे सर्वांचेच अंतिम उद्दिष्ट असल्यामुळे त्यासाठी प्रथम या देशांत नागरिक निर्माण करणें हा उद्योग त्यांनी आरंभिला. तोपर्यंत या देशांत राजाचे प्रजाजन होते. त्यांचा राज्यकारभाराच्या धोरणाशीं, समाजाच्या उन्नतिअवनतीशीं, कसलाहि संबंध नव्हता. राष्ट्रोत्कर्षाची जबाबदारी माझ्या शिरावर आहे, ही जाणीव त्या प्रजाजनांना मुळीच नव्हती. ही जाणीव असणें हें राष्ट्राच्या नागरिकाचें पहिले लक्षण होय. ही जाणीव निर्माण होण्यासाठी भौतिक विद्येचें ज्ञान, विचारशक्ति, विचारस्वातंत्र्य, समता, बुद्धिप्रामाण्य, कार्यकारणभावाचें ज्ञान, इहवादीवृत्ति, प्रवृत्तिपरता इत्यादि गुणांची आवश्यकता असते. हें जाणूनच या तीन थोर पुरुषांनी प्रारंभापासून त्या गुणांची येथल्या प्रजाजनांत जोपासना करण्याचे यावतशक्य प्रयत्न केले.
वर सांगितलेले जे व्यक्तिस्वातंत्र्य, समता, प्रवृत्तिपरता इत्यादि नागरिकत्वास अवश्य असणारे गुण त्यांचें प्रतिपादन या त्रिमूर्तीच्या आधी, राममोहन रॉय, दादाभाई, दादोबा पांडुरंग, म. फुले, लोकहितवादी, रानडे, दयानंद इ. जे थोर पुरुष भारतांत होऊन गेले यांनी केलेंच होते. मग या त्रिमूर्तीचें वैशिष्ट्य काय? प्रारंभी विषय-प्रवेश करतांना, त्या थोर नेत्यांनी वैचारिक क्रान्तीची पायाभरणी कशी केली होती,