Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/३४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महाभूतसमाधि । ३३१

मला तुझी त्याहूनहि नाही, हा मी चाललों.') या भर्तृहरीच्या वचनाने गव्हर्नर- साहेबांना सडेतोड उत्तर दिलें.
दिव्य मूलद्रव्ये
 लो. टिळकांची मूर्ति घडवितांना विधात्याने जी महाभूतसमाधि, जीं दिव्य मूलद्रव्यें निवडलीं तीं हीं अशीं होतीं. अचल ध्येयवाद, कार्येकनिष्ठा, असामान्य धैर्य, स्वयमेव मृगेंद्रता, स्थितप्रज्ञता, विद्वत्ता, व्यासंग, लोकवादी निष्ठा, निःस्सीम राष्ट्रभक्ति, पराकाष्ठेचें निर्ममत्व, पूर्ण निरंहकारी वृत्ति हीं गुणरत्ने घेऊनच त्याने त्यांचें व्यक्तिमत्त्व घडविलें होतें. त्यामुळेच तीस-चाळीस वर्षांच्या अवधींत धर्माचें पुनरुज्जीवन, स्वराज्याच्या राजनीतिशास्त्राचें प्रवर्तन, राष्ट्रीय अर्थशास्त्राची प्रस्थापना आणि सर्व सामाजिक सुधारणांची पायाभरणी करून अखिल भारतीय समाज ते जागृत व राष्ट्रतत्त्वावर संघटित करूं शकले. या अल्पावधींत त्यांनी या मरगळलेल्या समाजाला संजीवनी दिली आणि त्याला रणयज्ञाची दीक्षा देऊन भारतांत नवी सृष्टि निर्माण करण्याचें सामर्थ्य त्याला प्राप्त करून दिलें; आणि या लोकांतून जातांना "स जातो येन जातेन याति वंशः समुन्नतिम्" (जो जन्मल्याने सर्व वंश महत्पदास जातो तोच पुरुष खरा जन्मास आला) हें भर्तृहरीचें वचन ते सार्थ करून गेले. लोकमान्यांच्या जन्मामुळे केवळ टिळकवंशच समुन्नतीला गेला असें नव्हे, तर सारा मानववंशच समुन्नत झाला हें सत्य भावी इतिहास भक्तीने सांगेल.