महाभूतसमाधि । ३१९
साठी? युरोपांत त्यांनी स्वदेशाचें कार्य करावें म्हणून; पण कार्य कोणतें? टिळकांचा निरोप होता की, "तुमच्या मताने जें आपल्या मातृभूमीच्या हिताचें असेल तें करा. माझ्या मार्गाने या, असें मी म्हणत नाही. तसें तुम्ही केल्यास मला वाईटच वाटेल. तुम्ही स्वतःच्या मतांशी प्रामाणिक राहून योग्य दिसेल तें करा. तुमचा मार्ग तुम्ही ठरवा." रवीन्द्रनाथ म्हणतात, "माझ्या देशबांधवांनी माझ्या केलेल्या गौरवांत हा सर्वश्रेष्ठ गौरव होता. टिळकांच्या या व्यक्तित्वगुणाने मी फार प्रभावित झालों. टिळकांनी हें जाणलें होतें, की देशोद्धाराचे मार्ग अनेक असू शकतात, आणि प्रत्येक व्यक्तीला तिच्या गुणांचा विकास करण्यास पूर्ण अवसर मिळाला तरच ती स्वतंत्रपणे मार्ग आखून अनेक प्रकारे राष्ट्रोद्धाराचे कार्य साधूं शकेल." (आठवणी, खंड २रा, पृ. ६०८).
व्यक्तित्वाचे महत्त्व
१९२० सालच्या काँग्रेसचे अध्यक्ष सी. विजय राघवाचारियर यांनी टिळकांच्या लोकवादी वृत्तीचा असाच गौरव केला आहे. ते म्हणतात, "महापुरुष हे निकटच्या लोकांना महापुरुष वाटत नाहीत, अशी एक म्हण आहे, पण टिळक तिला अपवाद होते. जों जों मी त्यांच्या निकट आलों तों तों माझा त्यांच्याविषयीचा आदर वाढत गेला. याचें कारण हें की, दुसऱ्याच्या मतांविषयी त्यांनी कधीह असहिष्णुता दाखविली नाही. ज्यांनी त्यांना फार दुखविलें त्यांच्याबद्दलहि त्यांची वृत्ति अनुदार नव्हती. गोखल्यांच्या मृत्युसमयीचें त्यांचें भाषण याची साक्ष देईल." (आठवणी, खंड २ रा, पृ. ६४३). न्या. रानडे, आगरकर यांच्याविषयी टिळकांनी जे मृत्युलेख लिहिले त्यांचें हेंच वैशिष्ट्य आहे. त्यांच्या जीवनाचे रहस्य टिळकांनी जसें उलगडून दाखविलें तसें त्यांच्या अनुयायांनी सुद्धा दाखविलें नव्हतें. न्या. रानडे यांची वृत्ति अशीच होती. स्वतःकडे कमीपणा घेऊन त्यांनी अनेक वेळा टिळकांचा मुक्तमनाने गौरव केला, हें प्रसिद्धच आहे. हे दोघेहि महापुरुष खरे लोकवादी होते. आणि व्यक्तीच्या व्यक्तित्वाचें महत्त्व ते जाणीत होते, असा याचा अर्थ आहे. दोन तेजस्वी पुरुषांचें सख्य होणे अशक्य आहे, असें महाभारतांत एक वचन आहे; पण राष्ट्रकार्यासाठी असें सख्य होणें अवश्य आहे हें जाणून टिळकांनी तें अनेक वेळा घडवूनहि आणलें होतें. यासाठी या महत्कार्यासाठी, संपूर्ण आत्मलोप करण्याचीहि त्यांची सिद्धता होती. महात्माजींचा उदय होत होता, तेव्हा त्यांनी यापुढचे तुमचे तेच खरे नेते होत, असे अनेकांना पूर्ण स्थितप्रज्ञ-वृत्तीने सांगितलें. ते म्हणाले, "असहकारितेवांचून गत्यंतर नाही, हें तत्त्व मला पूर्ण मान्य आहे; परंतु लोकांची तयारी नाही म्हणून मी स्वस्थ आहें. महात्मा गांधींना तशी तयारी दिसत असेल किंवा तितकी तयारी करवून घेण्यास ते समर्थ असतील, तर लोकांनी सर्वस्व अर्पण करून त्यांना साह्य करावें. आफ्रिकेंतील महात्माजींची चळवळ सर्वांस ठाऊकच आहे व ह्या देशांत देखील ही चळवळ यशस्वीपणे चालवून दाखविण्यास इतका योग्य मनुष्य दुसरा