३२० । केसरीची त्रिमूर्ति
कोणी नाही, हे निर्विवाद आहे." (आठवणी खंड २ रा, पृ. २३३). ही वेदान्ती- वृत्तीची परिसीमा आहे. पंचवीस वर्षे अनभिषिक्त सम्राटाचा अनन्य अधिकार गाजविल्यानंतर शांतपणें हा नेता दुसऱ्या उदयोन्मुख नेत्यासाठी सिंहासन रिकामें करतो. या मनाच्या औदार्याला जगांत तोड नाही. राष्ट्रहितबुद्धीची, निर्ममत्वाची ही पराकाष्ठा आहे. हिच्यांतूनच टिळकांची लोकवादी वृत्ति उगम पावली व परिपक्व झाली.
व्यावहारिक मर्यादा
लो. टिळक वेदान्ती असले तरी त्यांचा वेदान्त व्यवहारी वेदान्त होता. आणि सर्व उदात्त तत्त्वांच्या बाबतींत असें असावेंच लागतें. मानवता, लोकशाही, समाजवाद, समता, बंधुता, स्वातंत्र्य, हीं अतिशय उदात्त तत्त्वें आहेत; पण प्रत्यक्ष व्यवहारांत त्यांना पदोपदीं मुरड घालावी लागते. नाही तर स्वार्थी मानव त्यांना विकृत रूप देऊन त्यांचा हेतु विफल व आचार अशक्य करून टाकतो. लोकशाही आणि समाजवाद यांच्या नांवाखाली आज सर्वत्र हेंच चालू आहे. लोकमान्यांना याची पूर्ण जाणीव असल्यामुळे उदात्त तत्त्वांच्या व्यावहारिक मर्यादा कोणत्या तें सांगण्यास ते कधी विसरत नसत. सर्वभूतात्मैक्य, आत्मौपम्य, अद्वैत, चराचराशी तादात्म्य हीं वेदान्ताचीं प्रधान तत्त्वें होत. त्याविषयी विवेचन करतांना 'सिद्धावस्था आणि व्यवहार' या गीतारहस्यांतील प्रकरणांत ते म्हणतात, "सर्व मानवजातीचें किंबहुना प्राणिमात्राचें ज्याने हित होईल तोच धर्म हा जरी अखेरचा सिद्धान्त आहे, तरी परमावधीची ही स्थिति प्राप्त होण्यास कुलाभिमान, धर्माभिमान, देशाभिमान या चढत्या पायऱ्या असल्यामुळे त्यांची आवश्यकता केव्हाही नाहीशी होत नाही... आत्मोन्नतीची परमावधीची स्थिति प्राप्त होईपर्यंत इतर राष्ट्र व समाज यांची स्थिति ध्यानांत घेऊन साधुपुरुषांनी आपआपल्या समाजास तत्तत्कालीं श्रेयस्कर होईल असा देशाभिमानी धर्मच त्यास उपदेशिला पाहिजे. समाजसुधारणेच्या दृष्टीने पाहिले तर कुलाभिमान जें विशिष्ट कार्य करतो तें केवळ देशाभिमानाने होत नाही, आणि देशाभिमानाचें कार्य निव्वळ सर्वभूतात्मैक्य- दृष्टीने सिद्ध होत नाही." (पृ. ३९७).
खोटा वेदान्त
नागपूरचे धुंडिराजपंत ठेंगडी यांनी टिळकांची एक आठवण दिली आहे. ते मानवतावादी होते. त्यामुळे 'स्वदेशी'ला त्यांचा विरोध होता. ते टिळकांना म्हणाले, "या चळवळीने आपण मानवजातीच्या उत्कर्षास विघ्न आणीत आहां. खुल्या व्यापाराचें तत्त्व आपणांस मान्य असूं नये हा चमत्कार आहे!" त्यावर टिळक शांतपणे म्हणाले, "होय. तुमचें म्हणणे बरोबर आहे. सर्व मानवजातीच्या दृष्टीने जेव्हा विचार कराल तेव्हा तुमचेंच म्हणणें खरें आहे; पण आज प्रथम आपणांस आपल्या देशापुरताच विचार करावयाचा आहे ना? शरीराच्या एकाच अवयवांतून रक्तस्राव होत असल्यास, बाकीच्या सर्व अवयवांकडे दुर्लक्ष करून प्रथम त्याच्याकडे लक्ष द्यावें लागतें. त्याचप्रमाणे सरकारने धुळीस मिळविलेल्या आपल्या उद्योगधंद्यांचे