Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/३३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महाभूतसमाधि । ३१७

कडूनच घेणें हें बरोबर नाही." त्यावर स्वामी म्हणाले, "अहो, लोकमान्य, तुम्ही लोकमान्य नव्हे, जगन्मान्य आहांत. पुण्यामध्येच काय, पण सबंध हिंदुस्थानमध्ये देखील तुम्ही सांगाल त्याप्रमाणे लोक ऐकतात. आम्ही सध्या नामधारी जगद्गु आहोत, तुम्हीच खरे जगद्गुरु आहांत."
 स्वकीय-परकीय, लहान-थोर पुरुषांना लो. टिळक कसे दिसले तें त्यांनी आपापल्या शब्दांत व्यक्त केलें आहे. टिळकांच्या व्यक्तिमत्त्वाचें त्यांतून स्पष्ट दर्शन घडतें. महाभूतसमाधि ती हीच. राष्ट्रार्थैकफल असे त्यांचे गुण ते हेच.
कालपुरुषाची चेष्टा
 भवितव्यतेला ते तुच्छ लेखीत असत हें तर प्रत्येक प्रसंगी दिसून आलें आहे. १९१५ साली होमरूल लीगच्या स्थापनेसंबंधी बोलणी चालली होती. बॅ. बॅप्टिस्टा यांनी एकदा १८९९ साली व एकदा १९०६ साली तशी सूचना केली होती; पण 'अजून वेळ आली नाही', असें दोन्ही वेळा टिळक म्हणाले होते. १९१५ सालीं त्यांनी ती सूचना पुन्हा मांडली तेव्हा टिळक म्हणाले, "होय. आता योग्य वेळ आली आहे. आता यामुळे माझा मंडालेकडे परत प्रवास सुरू होईल; पण तो धोका पत्करण्याजोगा आहे. तुम्ही अध्यक्षीय भाषणांत सूचना मांडा." सहा वर्षे मंडालेच्या एकान्तवासाचा अनुभव घेऊन आल्यावर पुन्हा वर्षाच्या आंतच, आणि तोहि साठाव्या वर्षी पुन्हा तिकडे जाण्याचा संभव दिसत असून, टिळकांनी होमरूल लीगच्या कार्यास प्रारंभ केला.
 आपल्याभोवती घिरट्या घालणाऱ्या कालपुरुषाची टिळक नेहमीच अशी चेष्टा करीत असत. १९०८ सालीं खटला चालू असतांना वातावरण फारच गंभीर झालें होतें. तेव्हा टिळक हसत हसत भोवतालच्या मंडळींना सहज म्हणाले, "आज काळ्या पाण्याचा रंग दिसतो आहे."
 भीषण भवितव्यतेला असें तुच्छ लेखण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठायी नसतें तर हिंदी राष्ट्र घडविण्याचें कार्य त्यांच्या हातून झालेच नसतें. हें राष्ट्र घडवावयाचें म्हणजे ब्रिटिशांच्या क्रूर, सैतानी, सत्तेला, प्रत्यक्ष यमदंडालाच आव्हान देणें प्राप्त होतें. चाळीस वर्षे केसरीच्या प्रत्येक लेखांत, आणि प्रत्येक भाषणांत टिळक हें आव्हान देत होते.
स्थितप्रज्ञता
 त्यांना हें धैर्य, हें बळ कोठून प्राप्त झालें? गीता, भगवद्गीता! भगवद्गीतारहस्य! स्थितप्रज्ञता हें गीतेचें रहस्य आहे. तीच त्यांनी साध्य करून घेतली होती. हरिदास मुरूडकरबुवा यांनी टिळकांना हाच प्रश्न विचारला होता. "आपण हें सर्व सहन कसें केलें? आपण गीतेच्या परिशीलनामुळे प्रज्ञाप्रतिष्ठित झाला आहां, जीवन्मुक्त कोटींतील आहां. त्याच भूमिकेवरून आपण कारागृहांतहि कारागृहातीत असला पाहिजे!" यावर टिळकांनी विनयाने सांगितले की, "त्या कोटींतील मी