Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/३३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३१६ । केसरीची त्रिमूर्ति

खळाळत असतात, वनराजींनी तो झाकलेला असतो, पण त्याच्या सुप्त सामर्थ्याची प्रतीति सारखी जाणवत असते."
 सुप्रसिद्ध वार्ताहर नेव्हिनसन हे सुरतेच्या राष्ट्रसभेच्या अधिवेशनास स्वतः उपस्थित होते. त्यांना टिळकांचें दर्शन कसें घडलें?- "आभाळांत काळे ढग येऊन वीज कडाडावी आणि वादळ व्हावें त्याप्रमाणे टिळक थेट समोरून येऊन अध्यक्षांच्या खुर्चीसमोर उभे राहिले. ते तक्रार करीत होते, निषेध करीत होते, हरकत सांगत होते; पण हें सर्व काम त्यांच्या शांत व निश्चयी स्वभावाप्रमाणे सुरू होतें. त्यांचा तो आवाज ऐकून वाटे की, हा मनुष्य भवितव्यतेलाहि तुच्छ मानीत आहे."
 ब्रिटिश पार्लमेंटचे मजूरपक्षीय सभासद कर्नल वेजवुड म्हणतात, "टिळकांची भेट होऊन आता पांच वर्षे झाली; पण माझ्या मनावरचा त्यांचा दरारा कायम आहे. इतर हिंदी जनांबरोबर मी बरोबरीच्या नात्याने बोलूं शकतों, त्यांच्या बरोबरीने हसतों, वाद घालतों, पण टिळकांच्या समोर हें धैर्य मला होत नसे. कारण टिळक म्हणजे पिढ्यान् पिढ्यांची दैवी स्थितप्रज्ञता, तपस्या व ज्ञानसाधना यांची साक्षात् पूर्तीच!"
 सुरत काँग्रेसनंतर टिळकांवर राजद्रोहाचा दुसरा खटला भरण्यांत आला होता. त्या वेळी डॉ. मुंजे व दादासाहेब खापर्डे त्यांना तुरुंगांत भेटावयास गेले होते. जेलरसाहेब एक मद्रासी हिंदु होते. त्यांनी तीन खुर्च्या मांडून टिळकांसकट सर्वांना बसावयास सांगितलें. आणि आपण अदबीने बाजूस उभे राहिले. थोड्याच वेळांत टेबलाच्या खणांतून पांढरी रोठा सुपारी व अडकित्ता काढून त्यांनी टिळकांसमोर ठेवला; आणि खाली वाकून ते म्हणाले, "मला माहीत आहे आपल्याला सुपारी खाण्याचा फार शोक आहे." त्यावर टिळक म्हणाले, "मी आता कैदी आहे हे आपण विसरलात वाटतें?" जेलरसाहेबांनी नम्रपणें उत्तर केलें, "आपल्यासारख्यांवर असे संकट येणें ही दुःखाची गोष्ट तर खरीच, पण आम्हासारख्यांना दुःखांत सुख हेंच की, अशा विभूतींच्या आगमनाने हें पापालय पुनीत होतें."
 पांडुरंग काशीनाथ पेंडसे यांनी एक आठवण दिली आहे. त्यांच्या घरी एकदा लोकमान्य गेले होते. तेथे त्यांनी त्यांच्या आजीला नमस्कार केला. त्या वेळेस पेंडशांच्या आजी म्हणाल्या, "रामराजा वनवासाला गेला त्या वेळेस जितकें दुःख प्रजेला झालें तितकेंच दुःख आपण ब्रह्मदेशांत जाते वेळीं प्रजेला झालें." हें ऐकून लोकमान्यांच्या डोळ्याला पाणी आलें. तें पाहून पेंडशांना आश्चर्य वाटलें. दृढ अंतःकरणाचा व कठोर निश्चयाचा हा पुरुष! लोकांचें प्रेम पाहून त्याला द्रव फुटतो. तेव्हा "व्रज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि!" असेच लोकमान्य आहेत हेंच खरें.
 संकेश्वराला गेले असतांना लोकमान्य तेथील श्रीमत् जगद्गुरु शंकराचार्य यांच्या मठांत गेले होते. त्या वेळीं स्वमींनी शाल देऊन त्यांचा सत्कार केला. तेव्हा लोकमान्य म्हणाले, "आम्ही आपले चरणीं कांही अर्पण करण्याचें सोडून आपले-