Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/३२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हिंदु-मुस्लिम वाद । ३१३

लावला पाहिजे. प्रत्येकाने खणखणीत आवाजाने आपल्या तोंडाने स्वराज्याची मागणी करणें हा या प्रयत्नाचा प्रारंभ होय." एका शिक्षकांशी बोलतांना याविषयी टिळकांनी आणखी स्पष्ट खुलासा केला आहे. ते म्हणतात, "या करारासंबंधी लोकांनी इतका बाऊ कां करावा तें समजत नाही. आज आम्हांस परकीय सरकारास तोंड द्यावयाचें आहे. त्या वेळी कमीअधिक प्रमाणांत मुसलमानबंधूंस मतदानाचे हक्क अधिक देण्यास काय हरकत आहे? स्वराज्य मिळाल्यानंतर हें प्रमाण केव्हाहि बदलतां येईल." (आठवणी, पृ. १ २, ११२).
 सी. एस्. रंगा अय्यर यांनी आपल्या आठवणींत टिळकांची भूमिका अतिशय स्पष्ट शब्दांत विशद केली आहे. ते म्हणतात, "लोकमान्यांनी लखनौ करार मोठ्या खुषीने केला होता असें नाही; पण त्यामुळे मुसलमानांचें समाधान होत असेल, ते काँग्रेसमध्ये त्यामुळे येत असतील, आणि मुख्य म्हणजे देशबाह्यनिष्ठा सोडून हिंदी राष्ट्रवादाला मान्यता देणार असतील तर करार करण्याजोगा आहे ", अशी त्यांची विचारसरणी होती. (आठवणी. पृ, २, ५६५).
विकृत धाष्टर्य
 लखनौ करारासंबंधी टिळकांची भूमिका काय होती याविषयी संदेहास यत्किचितहि जागा नाही, हें वरील विवेचनावरून ध्यानांत येईल. मुसलमानांचा स्वराज्यालाच विरोध होता. इंग्रजांचें राज्य त्यांना कायम हवें होतें. ही भूमिका सोडून ते स्वराज्याच्या मागणीला अनुकूल झाले, तींत सहभागी झाले. शिवाय राष्ट्रीयत्वाची बंधने पाळण्यासहि ते तयार झाले; आणि याच वृत्तीने ते प्रथम स्वदेशी-बहिष्कार या चळवळींत आणि नंतर होमरूलच्या चळवळींत सामील झाले. इतका पालट त्यांच्यांत झाला म्हणूनच त्यांना थोडें झुकते माप देण्यास टिळक तयार झाले. असे असतांना आज लखनौ करार हाच खरा पाकिस्तानचा पाया होय, आणि तो टिळकांनीच घातला, असा आरोप कांही जाणते लोक करीत आहेत, याचा मोठा विस्मय वाटतो. असा आरोप एक-दोघा पंडितांनी केला आहे असें नसून, तो एक संप्रदायच आहे, असें दिसतें. या संप्रदायाच्या मनांत महात्माजी, पं. नेहरू व त्यांची काँग्रेस यांना या घोर कृत्याच्या अपश्रेयांतून मुक्त करावयाचें आहे; आणि त्यासाठी ते टिळकांवर हा आरोप करीत आहेत, हें त्यांच्या लिखाणावरून स्पष्ट दिसून येतें. अन्यथा हें विकृत धाष्टर्य त्यांच्या हातून झालें नसतें.
 वास्तविक मुस्लिमांच्या बाबतींत टिळकांचा मार्ग पुढीलांनी अनुसरला असता तर, पाकिस्तानची आपत्ति टळली असती. मुस्लिमांच्या पाशवी अत्याचारांचा संघटित प्रतिकार करणें, 'ये यथा मां प्रपद्यन्ते' या धोरणाने त्यांच्याशी वागून हिंदूंच्या सामर्थ्याची त्यांना जाणीव करून देणें, आणि त्याचबरोबर त्यांच्यांत राष्ट्रीय वृत्तीचें बीज रुजवून त्याचा परिपोष करणें, हा टिळकांचा मार्ग होता. १८९३-९४ सालीं पुण्या-मुंबईस संघटित प्रतिकार झाल्यामुळे पुढे अनेक वर्षे महाराष्ट्रांत मुस्लिम अत्या