३१४ । केसरीची त्रिमूर्ति
चार करूं धजले नाहीत. आणि राष्ट्रीय वृत्तीला आवाहन केल्यामुळे कांही प्रमाणांत तरी ते स्वराज्याचा चळवळींत सामील झाले; आणि लखनौला स्वराज्याची मागणी काँग्रेसला एकमुखाने करतां आली. असें करतांना मुस्लिमांना कांही जादा सवलती द्याव्या लागल्या हा गौण पक्ष हें खरें. पण परराष्ट्रांशी सुद्धा कांही प्रसंगीं, थोडा गौण पक्ष स्वीकारून, करार करावे लागतात. येथे तर जे स्वकीय होण्याच्या मार्गावर होते त्यांच्या बाबतींत ही गौणता स्वीकारली होती; पण त्यांनी अत्याचार केले तर त्यांचा प्रतिकार करावयाचा; आणि पुढेमागे ही गौणता काढून टाकावयाची, अशी सतत सावधगिरी त्यामागे बाळगलेली होती.
याउलट टिळकांच्या नंतरच्या काँग्रेसच्या नेत्यांनी मुस्लिमांच्या देशद्रोही वृत्तीलाच खतपाणी घालून त्यांचा सतत अनुनय करण्याचें धोरण अवलंबिलें, मुस्लिमांनी भीषण अत्याचार केले तेव्हा 'शूर मोपले', 'भाई रशीद' म्हणून त्यांचे कौतुक केलें, त्यामुळे त्यांचें पाशवी आक्रमण वाढतच गेलें. पण यापेक्षाहि काँग्रेसचे अक्षम्य पाप म्हणजे भारतनिष्ठ मुस्लिमांना सतत दूर ठेवून तिने मुस्लिम लीगला जवळ केलें. आज बांगलामधील मुस्लिम बंगाली मातृभाषा मानतात, तिच्यासाठी प्राणार्पण करतात. रवींद्रांचें गीत राष्ट्रगीत म्हणून स्वीकारतात, पाकिस्तानला शत्रु लेखतात व भारतीय परंपरेचा आदर करतात. हेंच आज सिंधमध्ये चालू आहे. हें 'जिये सिंध' चळवळीवरून दिसून येतें. सिंधी मुसलमानांना पाकिस्तानांतून बांगलाप्रमाणेच फुटावयाचें आहे, सिंधी भाषेला ऊर्जितावस्था आणावयाची आहे. दाहीरच्या परंपरेचा ते अभिमान धरतात, आणि महंमद कासीमला आक्रमक समजतात. याच राष्ट्रीय वृत्तीचे जे मुस्लिम त्या काळीं भारतांत होते- तसे ते निश्चित होते हें सरहद्द प्रांतांत त्याच वेळी दिसत होतें- त्यांना आपले, स्वकीय मानून, त्यांचा पक्ष वृद्धिंगत करणें व त्यांच्या सहकार्याने भारतनिष्ठेची मुस्लिमांत जोपासना करणें हा मार्ग महात्माजी- पंडितजींनी अनुसरला असता तर भारत निश्चित अखंड राहिला असता. लोकमान्यांनी प्रारंभापासून तोच मार्ग आखला व अनुसरला होता; पण वरील थोर नेत्यांनी सर्वस्वीं विपरीत व विनाशगामी मार्ग स्वीकारला; आणि त्यांच्याच शब्दांत म्हणावयाचें, तर मातृभूमीचे तुकडे केले.
बांगला, सिंध, वायव्यप्रांत येथे आज भारतीय प्राचीन परंपरेच्या भक्तीचें, मातृभूमीच्या निष्ठेचें जें उधाण आलें आहे व पाकिस्तानविषयी जो जहरी कडवा द्वेष तेथे उफाळत आहे त्यावरून टिळक मार्ग अनुसरला असता तर पाकिस्तान निश्चित टळलें असतें यांत शंका नाही. डोळ्यासमोर घडलेल्या इतिहासाचा हा निष्कर्ष स्पष्ट दिसत असतांना पाकिस्तानचे अपश्रेय टिळकांना देणाऱ्यांची बुद्धि विकृत आहे, असेंच म्हटलें पाहिजे. अजूनहि शहाण्या माणसांनी सावध होऊन मुस्लिमांच्या बाबतींत लोकमान्यांच्या तत्त्वांचा पुन्हा अवलंब करावयाचें ठरविलें, तर यापुढच्या अनेक आपत्ति टळण्याचा संभव आहे.