३१२ । केसरीची त्रिमूर्ति
व बंगालमध्ये त्यांची बहुसंख्या होती. तेथे प्रमाणापेक्षा कमी जागा मिळाल्या. पण अन्यत्र जास्त जागा दिल्यामुळे, डॉ. मुंजे, पं. मालवीय आणि बहुसंख्य हिंदुसभावादी लोक यांचा कराराला विरोध होता. तरीहि टिळकांनी तो घडवून आणला, याचें कारण एकच. मुस्लिमांत राष्ट्रीय वृत्तीची वाढ होण्याची शक्यता त्यांना त्या वेळीं वाटली. ऑक्टोबरमध्ये अहमदाबादच्या प्रांतिक परिषदेचे अध्यक्ष बॅ. जीना होते. "आपण सर्व आता नॅशनॅलिस्ट झालों", असें त्या वेळीं ते म्हणाले. लखनौ करार करण्यांत टिळकांचें हेंच सूत्र होते. मागे निर्देशिलेल्या २९-१२-१९१६ च्या केसरीच्या लेखांत त्यांनी पुनः पुन्हा तें सांगितलें आहे. "मवाळ जहाल, हिंदु-मुसलमान हे पक्षभेद उगवत्या राष्ट्रीय बुद्धीच्या तेजामुळे वितळून गेले. शेवटच्या मुसलमान नबाबाच्या राजधानींत (लखनौला) एकाच सभापीठावर बसून मुसलमान व हिंदु विद्वानांनी प्रत्यक्ष स्वराज्याची मागणी केली, त्या अर्थी ब्युरॉक्रसीची सद्दी आता संपली", असे त्यांनी म्हटले आहे. हिंदुस्थानांत हिंदु बहुसंख्य आहेत. त्यामुळे, ब्रिटिश गेले तर त्यांचीच सत्ता स्थापन होईल, अशी भीति मुस्लिमांना वाटत होती, म्हणून स्वराज्याला त्यांचा विरोध होता, तो आता गेला; म्हणून टिळकांनी म्हटलें की, "हिंदी लोकांपैकी कोणत्याहि वर्गाच्या हाती सत्ता आल्यास ती एका दृष्टीने आपल्याच हाती आल्यासारखी आहे, अशी बुद्धि मुस्लिमांत उदित झाली नसती, तर कायदेकौन्सिलांतील प्रतिनिधींच्या प्रमाणासंबंधी करारमदार करून का होईना, पण स्वराज्याचे मागणीत ते हिंदी लोकांना कधीहि मिलाफी झाले नसते." लो. टिळकांचें करारामागचें सूत्र या शेवटच्या वाक्यावरून स्पष्ट होईल. आपण सर्व हिंदी एक ही भावना मुस्लिमांची असली पाहिजे, म्हणजे ते राष्ट्रीय झाले पाहिजेत, म्हणजेच त्यांनी राष्ट्रीयत्वाची सर्व बंधने पाळली पाहिजेत; याचाहि अर्थ टिळकांनी अनेक वेळा स्पष्ट केला आहे. शिवाजीला त्यांनी राष्ट्रपुरुष मानावें, गणेशोत्सवांत सामील व्हावें व स्वदेशी- बहिष्कारासारख्या राष्ट्रीय चळवळींत सहभागी व्हावें, हा तो अर्थ होय. मुस्लिमांना प्रमाणाबाहेर प्रतिनिधित्व देतांना व पुढे, अधिकाराच्या जागा वाटेल तर हिंदूंना द्या वाटेल तर मुसलमानांना द्या, पण आमच्यापैकी कोणाला तरी द्या, असें म्हणतांना त्यांची हीच भूमिका होती." राष्ट्रीय भावनेचें खरें बीज यांतच आहे, व हें बीज हिंदुस्थानच्या भूमींत आता रुजलें गेलें याविषयी सरकारासहि फारशी शंका उरेल, असें आम्हांस वाटत नाही." असें त्या लेखाच्या समारोपांत त्यांनी म्हटले आहे. लखनौच्या आधिवेशनानंतर ३० डिसेंबरला तेथेच स्वराज्य संघ परिषद् भरली होती. त्या वेळींहि टिळकांनी करार करतांना आपल्या अपेक्षा काय होत्या तें स्पष्ट केलें. "स्वराज्याच्या मागणीत मुसलमान बंधु सामील व्हावे म्हणूनच त्यांना या विशेष सवलती दिल्या आहेत. तशा दिल्यामुळे आता त्यांची स्वराज्य-सिद्धीची जबाबदारी वाढेल. इंग्रजांच्या हातून सत्ता हिसकावून घ्यावयाची तर रस्सीखेचीच्या खेळांत आमच्याबरोबर मुसलमानांनीहि हातभार