Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/३२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हिंदु-मुस्लिम वाद । ३११

सेक्रेटरी, अशी निवड करण्यांत आली. वंगभंग, वंदे मातरम्, स्वदेशी आणि बहिष्कार या चळवळीमुळे हिंदु-मुस्लिम ऐक्याला थोडें बरें रूप येत होतें हें यावरून दिसून येईल. अर्थात् हें ऐक्य अल्पजीवी ठरलें. मोर्ले-मिंटो सुधारणा लवकरच आल्या आणि मिंटोसाहेबांना राष्ट्रसभा व मुस्लिम समाज यांत पाचर मारण्यांत मोठेच यश आलें.
 यानंतर टिळक लवकरच तुरुंगांत गेले. त्याआधी त्यांनी राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली होती व 'बहिष्कार' याचा सरकारच्या सर्व कारभारावर- लष्करावर, मुलकी खात्यावर, पोलिसखात्यावर, न्यायखात्यावर बहिष्कार- असा व्यापक अर्थ सांगून, त्याच्या सांगाती करबंदीची चळवळ करण्याची घोषणाहि केली होती. ती सुरू झाली असती तर कदाचित् वंगभंगाप्रमाणेच मुस्लिमांत पुन्हा स्वराज्याच्या मागणीत सहभागी होण्याची वृत्ति निर्माण झाली असती. पण ती चळवळ झालीच नाही; आणि टिळक सुटून येऊन होमरूलची चळवळ सुरू करीपर्यंत मुस्लिम समाजांत अराष्ट्रीयत्वाची, ब्रिटिश-धार्जिणेपणाचीं, विभक्ततेची विष-बीजें फार खोलवर रुजली होती.
भेद वितळले
 पण १९१२ साली ब्रिटिशांनी तुर्कस्थानच्या सुलतानाविरुद्ध भूमिका घेतल्यामुळे पुन्हा हिंदी मुस्लिमांत ब्रिटिशविरोधाची लाट आली. त्या सालीं ग्रीस, बल्गेरिया, इत्यादि तुर्की साम्राज्यांतील चार देशांनी उठावणी करून सुलतानाचा पराभव केला. त्याआधी इजिप्त, त्रिपोली, मोरोक्को ह्या प्रकरणांवरून, ब्रिटिश हे इस्लामचे शत्रु, अशी हिंदी मुस्लिमांची भावना झालीच होती; आणि या वेळींहि त्यांनी तुर्की सुलतानाविरुद्ध पक्ष घेतला. त्यामुळे अलिगडचे मुस्लिमहि संतप्त झाले, व हिंदी मुस्लिमांची इंग्रजी राज्याविरुद्ध एक फळी तयार होऊन तिने काँग्रेसशी सहकार्य करण्याचे ठरविलें. त्या वेळी काँग्रेसच्या धुरीणांनी या वृत्तीचें आनंदाने स्वागत केलें; आणि १९१३ साली काँग्रेसचे अध्यक्षपद नबाब सय्यद महमूद यांना दिलें.
सर्व नॅशनॅलिस्ट
 मुस्लिमांची ही ब्रिटिश- शत्रुत्वाची वृत्ति हळूहळू वाढत गेली. पहिल्या महायुद्धांत तुर्की सुलतान इंग्रजांच्या विरुद्ध पक्षाला म्हणजे जर्मनीला मिळाला होता. त्यामुळे ती जास्त तीव्र झाली. मुस्लिमांच्या या ब्रिटिश- शत्रुत्वाच्या मागे प्राधान्याने पॅन् इस्लामिझमची भावना होती हें खरें. तरी त्या शत्रुत्वांतून थोड्या प्रमाणांत राष्ट्रीयत्वाची भावनाहि निर्माण होत होती. वंगभंग, स्वदेशी, बहिष्कार या चळवळींच्या वेळी तशी ती कांही प्रमाणांत झाली होती हें टिळकांनी पाहिलें होतें. म्हणूनच त्यांनी होमरूलच्या चळवळींत त्यांना सामील करून घेऊन तिचा परिपोष करण्याचा प्रयत्न केला. लखनौचा करार त्यांतूनच निर्माण झाला. १९१६ साली लखनौला काँग्रेसच्या अधिवेशनांत झालेल्या कराराअन्वये, मुस्लिमांना पंजाब व बंगाल सोडून इतर प्रांतांत त्यांच्या लोकसंख्येपेक्षा फार जास्त प्रमाणांत जागा मिळाल्या. पंजाब