३१० । केसरीची त्रिमूर्ति
अजूनहि त्यांच्यावर केला जातो, याचें कारण एकच. ते हिंदु धर्माचे अभिमानी होते, मराठ्यांनी मुस्लिमसत्तेचें निर्दाळण केलें हें ऐतिहासिक सत्य ते मान्य करीत होते, अफजुलखानाला शिवछत्रपतींनी ठार केलें, हें योग्यच केलें, असें म्हणत होते, आणि स्वधर्म व प्राचीन परंपरा यांचा अभिमान जागृत करून हिंदूंना संघटित होऊन प्रतिकार करण्यास सांगत होते.
टिळकांनी मुसलमानांवर टीका केली, त्यांच्या अत्याचारांना विरोध केला तो मुस्लिम अराष्ट्रीय वृत्तीची जोपासना करीत होते म्हणून. ते विधर्मीय म्हणून नव्हे; पण इंग्रज अधिकारी व सुधारक मात्र त्यांच्यावर तसा आक्षेप घेत असत; पण वर केलेल्या विवेचनावरून हें ध्यानांत येईल की, मुस्लिम हे ब्रिटिशांचे हस्तक होऊन राष्ट्रसभेला विरोध करीत होते, आपण राज्यकर्ते आहोंत अशा वृत्तीने ते हिंदूंशी चढेलपणे वागत होते व या देशाच्या हिताशी एकरूप होत नव्हते म्हणून टिळक त्यांच्यावर टीका करीत होते; पण अशी टीका करीत असतांनाहि त्यांना राष्ट्रीय वृत्तीची शिकवण देऊन काँग्रेसमध्ये आणण्याचा व स्वराज्याच्या लढयांत सामील करून घेण्याचा त्यांनी आपला प्रयत्न मात्र कधीहि सोडला नव्हता.
हिंदी मुसलमान
या त्यांच्या प्रयत्नाला थोडें थोडें यशहि येत होतें. शिवाजी-उत्सवांत मुस्लिमांनी सहभागी व्हावें असा उपदेश ते करीत; आणि अनेक ठिकाणीं मुस्लिम लोक तसे सहभागी झालेहि होते. पुढे वंगभंगामुळे प्रक्षोभ होऊन स्वदेशी-बहिष्काराची चळवळ सुरू झाली. तींतहि मुस्लिमांनी येऊन मिळावें असें आवाहन टिळकांनी केलें व प्रारंभीं त्याला प्रतिसादहि बरा मिळाला. बारिसालची परिषद् ही वंगभंगाच्या प्रतिकारासाठीच भरली होती. वंदे मातरम् हें राष्ट्रगीत म्हणण्याचा हक्क लोकांना, सिद्ध करावयाचा होता; आणि अशा या परिषदेचे अध्यक्ष होते. बॅ. रसूल व एक पुढारी होते लियाकत हुसेन.
पुढे १९०६ साली मुस्लिम लीगची स्थापना झाली. राष्ट्रीय सभेच्या द्वेषांतूनच तिचा जन्म झाला होता हें उघड आहे. तरीहि त्या वेळीं पुष्कळ मुसलमानांना ती पसंत नव्हती. कलकत्त्याच्या राष्ट्रसभेपुढे बंगालच्या फाळणीच्या निषेधाचा ठराव, लीगचे संस्थापक जे डाक्याचे नबाब त्यांच्या बंधूंनीच मांडला होता. सभेला पन्नास-साठ मुस्लिम प्रतिनिधीहि होते. स्वदेशीच्या ठरावाला टिळकांनी उपसूचना मांडली तिला बॅ. रसूल, अलिगडचे फाजल हुसेन व काझी सयफ उद्दिन यांनी अनुमोदन दिलें. त्यानंतरच्या एका सभेत बडोद्याचे हायकोर्ट जज्ज शमसुद्दीन तय्यबजी यांचें व्याख्यान झाले. त्यांनी "मुसलमानांनीहि राष्ट्रीयत्वाची बंधने पाळली पाहिजेत", असें सांगितलें. डाक्याच्या नबाबांनी लीगची स्थापना करून आरंभिलेल्या भेदनीतीचा सभेत निषेध करण्यांत आला. आणि सभेत शेवटी 'हिंदी मुसलमान संघ' स्थापण्यांत येऊन नबाब सय्यद महंमद बहादूर हे तिचे अध्यक्ष व हैदर रेझा हे