हिंदु-मुस्लिम वाद । ३०९
राष्ट्रपुरुष आहे, तो अवतारी पुरुष म्हणून धर्म-बुद्धीने आम्ही त्याचा उत्सव करीत नसून, एक राष्ट्रीय नेता म्हणून त्याला वंद्य मानतों, हें त्यांनी अनेक ठिकाणीं स्पष्ट केलें आहे. शिवाजी-उत्सवांतील एका व्याख्यानांत त्यांनी सांगितले की, शिवाजी- उत्सव मुस्लिमांविरुद्ध नाही, शिवाजी महाराष्ट्रांत जन्मला हा केवळ योगायोग आहे, अन्यत्र आम्ही अकबराचाहि उत्सव केला असता. मोगल आक्रमक होते म्हणून त्याने त्यांचा प्रतिकार केला. मुस्लिम म्हणून नव्हे. पुढील राष्ट्रपुरुष कदाचित् मुसलमानांत जन्म घेईल. आम्ही त्याला असेंच मानूं. (रायटिंग्ज् ॲण्ड स्पीचेस्, पृ. ३२, गणेश अँड कंपनी, मद्रास). २० ऑगस्ट १९०१ व १६ मे १९०५ या केसरींतील लेखांत त्यांनी हाच विचार अशाच शब्दांत मांडला आहे. ते म्हणतात, "मुसलमान किंवा खिश्चन हे आमचे शत्रु नव्हेत. 'विनाशाय च दुष्कृताम्' असा शिवाजीचा उद्योग होता; मुस्लिम धर्मीयांविरुद्ध नव्हे. त्याच्या जागी कोणी मुसलमान असतां, तरी त्याचाहि आम्हीं, उत्सव केला असता. या देशांतले थोर पुरुष, मग ते ब्राह्मण असोत, मराठा असोत, मुसलमान असोत, त्यांचे गुणगान करून राष्ट्रीयत्व जागृत ठेवणें हें आमचें कर्तव्य आहे. जातीकडे किंवा धर्माकडे न बघतां राष्ट्रकार्य करण्यास आपण त्यांच्यापासून शिकावें." अकोला येथील 'आमची दुःस्थिति व आमचें प्राप्तव्य' या व्याख्यानांतहि हाच आशय त्यांनी व्यक्त केला आहे. "आम्हांला गुणांची अपेक्षा आहे, जातीची नाही." म्हणून मुस्लिमांनीहि शिवाजी-उत्सवांत सामील व्हावें, असें तें सांगत.
मुसलमानांना शिवाजी-उत्सवांत सामील होण्यास सांगणे यांत खरोखर विपरीत असें कांही नाही. आज इजिप्त, तुर्कस्थान, इराण इत्यादि देशांतील मुसलमान तेथील मुस्लिमेतर ऐतिहासिक राष्ट्रपुरुषांचा आत्मीयतेने अभिमान बाळगीत आहेत. बांगला देशांतील शेख मुजिबुर रहमान हे रवींद्रनाथांना राष्ट्रपुरुष मानतात. त्यांचें गीत बांगला मुस्लिमांनी राष्ट्रगीत मानले आहे. मुजिबुर रहमान हे दुर्गा, कालीमाता यांच्या उत्सवांत आनंदाने सामील होतात. हीच राष्ट्रीय दृष्टि टिळक मुसलमानांना शिकवीत होते. गणेशोत्सवामागेहि त्यांची हीच राष्ट्रीय दृष्टि होती. गणेशोत्सव सुरू करण्यांत हिंदूंना एकधर्मीयत्वाच्या बंधनांनी संघटित करावें हा हेतु निश्चित होता; पण त्यांत मुस्लिमांविरुद्ध असें कांही नव्हतें. कारण त्यांतहि मुस्लिमांनी सामील व्हावें असें त्यांनी आवाहन केलें होतें; आणि प्रारंभी अनेक मुस्लिमांनी तें मानलेंहि होतें. नाशिक, सोलापूर येथे व इतर अनेक शहरांत मुसलमान गणेशोत्सवांत सामील झाले होते. नाशिकला तर गणोशोत्सवाचें नेतृत्वच मुसलमानांनी केलें होतें. ही माहिती देऊन, टिळक हे हिंदु-मुस्लिम ऐक्याचे अत्यंत मोठे पुरस्कर्ते होते, असें डॉ. राम गोपाळ यांनी आपल्या 'इंडियन मुस्लिम' या ग्रंथांत म्हटलें आहे. (पृ. ८७- ९५). गणेशोत्सव हा मुस्लिमांविरुद्ध नव्हता, असें रौलट रिपोर्टातहि मान्य केलेले आहे. तरी टिळक हे मुस्लिमांचे शत्रु होते, प्रतिगामी होते, असा आरोप