Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/३२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३०८ । केसरीची त्रिमूर्ति

हे तुमच्यासारखेच पराक्रमी आहेत, हें विसरूं नका. मराठ्यांनीच तुमची सत्ता नामशेष केली होती. दोन्ही जमातींनी एकमेकींच्या शौर्याची व पराक्रमाची जाणीव ठेवली की दंग्याचे पहिले कारण नाहीसें होईल, व हिंदु आणि मुसलमान दोघेहि मिळून आपल्या शक्तीचा उपयोग दोघांच्या साधारण हितासाठी करतील. आज हिंदु-मुसलमानांनी एकत्र राहवयाचें तें कांही अंशी अमेरिकेत निरनिराळ्या जातींचे व धर्माचे लोक जसे एकत्र राहतात तशा प्रकारेंच राहिलें पाहिजे. (हिंदु-मुसलमानांचा समेट, केसरी, १०-१०-१८९३). हिंदु-मुसलमानांत सलोखा कसा होईल हे सांगतांना टिळकांनी अनेक ठिकाणीं सांगितलें आहे की, मुस्लिमांत विद्येचा प्रसार झाला पाहिजे, म्हणजे त्यांना राष्ट्रीय दृष्टि येईल. याशिवाय त्यांच्या ठायीं हिंदूंच्याप्रमाणे धर्मसहिष्णुता आली पाहिजे. ती आली तर आपला धर्म आपण पाळावा, दुसऱ्याचा त्यास पाळू द्यावा, अशी त्यांची वृत्ति होईल; आणि तिसरी गोष्ट म्हणजे वर सांगितलेल्या इतिहासाची जाणीव मुस्लिमांनी ठेवली पाहिजे. आपण एकदा राज्यकर्ते होतों या विचाराने आजहि मुसलमान उन्मत्तपणें वागूं पाहतात. ही वृत्तीहि त्यांनी सोडून दिली पाहिजे. इतकें झाल्यावर इंग्रज सरकार आपल्याला ज्या गोष्टी सांगतें त्या आपमतलबीपणाच्या आहेत, हें मुसलमानांच्या ध्यानांत येईल. आणि ह्या दोन्ही जमाती या देशांत सलोख्याने नादूं लागतील.
 टिळकांचा हा उपदेश कांही सुबुद्ध मुसलमानांना तरी त्या वेळीं पटला होता. बॅ. जिना हे यामुळेच टिळकांचे अनुयायी झाले होते, आणि आरंभीं नव्हे, पण पुढे पुढे अल्लीबंधूहि, टिळकच आमचे खरे राजकीय गुरु, असें म्हणत असत. (केळकर- टिळक-चरित्र, खंड १ ला, पृ. ३६५). पुढे काँग्रेसने ब्रिटिशांचेच धोरण स्वीकारलें त्यामुळे सर्वच बिघडलें तो भाग निराळा.
पुरोगामी कोण?
 हिंदु-मुसलमानांच्या दंग्यांत लो. टिळकांनी हिंदूंचा पक्ष घेतला, त्यांना प्रतिकाराची प्रेरणा दिली, मागल्या इतिहासाची त्यांना व मुसलमानांनाहि जाणीव दिली; त्यामुळे त्यांना मुस्लिम तर आपले शत्रु मानीतच, पण सुधारक पक्षाचे रानडे, फिरोजशहा मेथा यांसारखे नेतेहि त्यांना पुराणवादी व प्रतिगामी मानीत. त्या वेळेपासून आजपर्यंत भारतांत हें ठरून गेलें आहे. हिंदूंना जो संघटित होण्याचा उपदेश करील, मुस्लिम आक्रमणाचा प्रतिकार करण्यास सांगेल, तो प्रतिगामी, तो पुराणवादी. जो त्यांच्यापुढे लाचार होईल, त्यांचा अनुनय करील, वंदे मातरम् या राष्ट्रगीताचाहि अवमान त्यासाठी सहन करील, तो खरा उदारमतवादी व पुरोगामी.
 केवळ संघटित होऊन प्रतिकार करण्याचा उपदेश हिंदूंना केला एवढ्यावरूनच टिळक पुराणवादी ठरले. मग त्यांनी गणेशोत्सव व शिवाजी-उत्सव सुरू केल्यावर त्यांच्या आक्षेपकांना जोर चढला असेल यांत काय नवल? पण ह्या दोन्ही उत्सवांत टिळकांची विशुद्ध राष्ट्रीय भूमिका रेसभरहि कधी ढळली नव्हती. शिवाजी हा