लो. टिळक व सामाजिक सुधारणा । २९९
स्वस्थ बसणार नाही, असें सरकारलाच नव्हे, तर सर्व जगाला जाहीरपणें दाखवून दिलें, तर त्याचें फळ पदरांत पडल्यावांचून राहणार नाही."
सर्व जाति सर्व पंथ
होमरूलच्या प्रचारासाठी टिळकांचा देशभर दौरा चालू असतांना सर्व धर्मांचे, सर्व जातींचे, पंथांचे लोक संघाचे सभासद होत होते. होमरूल लीगच्या- हिंदी स्वराज्य संघाच्या- पहिल्या वार्षिक संमेलनाच्या सभेंत चिटणीसांनी अहवाल सांगितला. त्यांत नमूद केलेलें आहे की, एकंदर १४२१८ सभासद नोंदविले गेले. त्यांत शे. ४२ ब्राह्मण व शे. ४३ ब्राह्मणेतर असून ३०९ मुसलमान, ११ पारशी व ६७ स्त्रिया आहेत. २६ डिसेंबर १९१७ सालची राष्ट्रसभा कलकत्त्यास झाली. त्या वेळीं १२ लक्ष सह्यांचा अर्ज माँटेग्यूसाहेबांकडे पाठविण्यांत आला आहे असें सांगण्यांत आलें. त्याच वेळीं मद्रासच्या ब्राह्मणेतरांकडून व पंचम लोकांकडूनहि स्वराज्याच्या मागणीला अनुकूल असा संदेश आला होता. पुढील मार्चमध्ये मुंबईला सभा झाल्या. मारवाडी विद्यालयाची सभा झाली व त्या लोकांनी स्वराज्य संघाला १५००० रुपयांची थैली दिली. ता. २५ रोजीं एल्फिन्स्टनरोडवर सुमारे ४० गिरण्यांतील कामगारांची सभा झाली. सोळा हजार कामगारांनी एकेक आणा वर्गणी देऊन १००० रु. जमविले व ती थैली टिळकांना अर्पण केली.
सर्व प्रकारचें शिक्षण सर्वांना सारखें मिळालें पाहिजे, प्रत्येक सार्वजनिक संस्थेत प्रत्येक व्यक्तीला जाति-वर्ण-धर्म-निरपेक्ष प्रवेश मिळाला पाहिजे या संबंधांत कसलीहि उच्चनीचता, कसलाहि भेदाभेद असतां कामा नये, असा टिळकांचा कटाक्ष होता. काँग्रेस, हिंदी स्वराज्य संघ यांविषयी उदाहरणे येथे सांगितली. गणेशोत्सव, शिवाजी-उत्सव, स्वदेशी, बहिष्कार, साराबंदी ह्या चळवळी यांसंबंधीची उदाहरणें मागल्या प्रकरणांतून आलींच आहेत. तेव्हा समता, बंधुता, स्वातंत्र्य याच तत्त्वांचा अवलंब टिळक प्रत्येक ठिकाणी करीत असत, याविषयी संदेहास जागा नाही.
प्रतिगामी?
असे असतांना टिळक हे प्रतिगामी होते, सनातन धर्माचे अंध अभिमानी होते, सामाजिक सुधारणांना त्यांचा विरोध होता, ते सुधारणाद्वेष्टे होते, असे आरोप त्यांच्यावर येतात ते कां? लोकांच्या मनांत टिळकांविषयी पराकाष्ठेचा आदर असला तरी, सनातन धर्माधिमानी, सुधारणाविरोधी अशीच त्यांची लोकमानसांत प्रतिमा आहे. असें कां असावें याचा गंभीरपणें विचार केला पाहिजे. कारण अशी प्रतिमा निर्माण झाल्यामुळे समाजाची मोठी हानि झाली आहे, असे मला वाटतें.
वरील सुधारणांखेरीज स्त्रीजीवनविषयक ज्या अनेक सुधारणा त्यांना आपण अनुकूल आहोंत; केसरीने त्यांना कधीच विरोध केलेला नाही, असें टिळकांनी वारंवार म्हटलें आहे. स्त्री-शिक्षण, प्रौढ-विवाह, पुनर्विवाह ह्या सुधारणांना आपला विरोध नाही; फक्त ह्या सुधारणा जनमत तयार करून सावकाशीने केल्या पाहिजेत,