Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/३१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३०० । केसरीची त्रिमूर्ति

सरकारकडून कायदा करून घिसाडघाईने करतां कामा नयेत, अशी त्यांची भूमिका असल्याचे त्यांनी अनेक वेळा सांगितलें आहे.
 टिळकांनी पुनः पुन्हा विशद केलेली ही भूमिकाहि अंध किंवा सनातनी अशी नाही, पुरोगामीच आहे. असे असूनहि टिळक हे रूढिग्रस्त सनातन पक्षाचे नेते, असें मानले गेलें त्याचें कारण काय?
असमर्थनीय
 याचें मुख्य कारण असें की, अशी भूमिका असूनहि टिळकांनी फीमेल हायस्कूल- मधील स्त्री-शिक्षण, संमतिवयाचा कायदा, दादाजी विरुद्ध रखमाई, राष्ट्रीय सभेच्या मंडपांत सामाजिक परिषद् भरविण्यासंबंधीचा वाद, ग्रामण्य प्रकरण, वेदोक्त प्रकरणं असे वाद-प्रसंग जेव्हा निर्माण झाले तेव्हा प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या कारणाने सनातन्यांचा पक्ष घेतला. एवढेच नव्हे, तर त्या त्या वेळीं सुधारकांचा व सुधारणांचाहि कमालीचा उपहास केला. टिळकांच्या या विरोधाचें व उपहासाचें समर्थंन कोणत्याहि युक्तिवादाने करतां येत नाही.
 प्राचीन धर्मशास्त्रांतील कांही वचनांवर नवें भाष्य करून, त्या शास्त्रकारांची स्त्रियांविषयीची दृष्टि उदार होती, असें न्या. रानडे यांनी दाखविण्याचा प्रयत्न केला- या प्रयत्नाचें टिळकांनी वास्तविक अभिनंदन करावयास हवें होतें; पण तसें न करतां त्यांनी रानडे यांच्यावर अति कडक भाषेत टीका केली. १८८६ साली मुंबईच्या माधवबागेंत, सरकारने आमच्या सामाजिक चालीरीतींत हात घालूं नये असा अर्ज करण्यासाठी सभा भरली होती. त्या वेळी तेलंगांनी ठरावाला उपसूचना पाठविली की, "अर्जांत, बालविवाह व असंमत वैधव्य यांचे वाईट परिणाम आम्हांस ठाऊक आहेत, पण ते आमचे आम्हीच सुधारले पाहिजेत, सरकारने त्यांत हात घातल्यास नुकसानच होईल, असे शब्द घालावे." टिळकांनी या सूचनेचा पुरस्कार करावयास हवा होता. कारण तीच टिळकांची तंतोतंत भूमिका होती; पण ज्या सनातन्यांनी ती सूचना फेटाळली त्यांचाच पक्ष टिळकांनी घेतला. राष्ट्रीय सभेच्या मंडपाचा वाद हा तर अगदी असमर्थनीय वाटतो. १८९५ सालापर्यंत काँग्रेसच्या मंडपांतच मागून सामाजिक परिषद् भरत असे. १८९५ साली पुण्यास काँग्रेसचें अधिवेशन होतें. त्या वेळीं, त्या मंडपांत मागून सुद्धा सामाजिक परिषद् भरतां कामा नये, असा पुण्याच्या सनातन पक्षाचा आग्रह पडला. प्रारंभी टिळकांना तो मान्य नव्हता. पुढे अनेक घडामोडी होऊन टिळकांना सेक्रेटरीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि नंतर मात्र टिळकांनी सनातन्यांचा पक्ष आवेशाने घेतला.
प्राचीन धर्मशास्त्र
 अशा वादांत टिळक नेहमी प्राचीन धर्मशास्त्राची मर्यादा उल्लंघू नये असें सांगत. त्या धर्मशास्त्राचा अभिमान प्रगट करीत. वस्तुस्थिति अशी आहे की, हिंदूच्या प्राचीन धर्मशास्त्रांत पुरोगामी व प्रतिगामी दोन्ही पक्षांना वाटेल तेवढे आधार