२९८ । केसरीची त्रिमूर्ति
गुणकर्मनिष्ठ
लो. टिळकांना चातुर्वर्ण्याचा अभिमान होता, पण तें चातुर्वर्ण्य गुणकर्मनिष्ठ असें होतें. जन्मनिष्ठ चातुर्वर्ण्य हें व्यक्तीच्या विकासाच्या आड निश्चितच येतें आणि तशा व्यवस्थेंत, प्रत्येक व्यक्तीला तुझ्या शिरावर राष्ट्रीय प्रपंचाची जबाबदारी आहे, असें सांगण्याला अर्थ नाही; पण टिळकांना तसलें चातुर्वर्ण्य मान्य नव्हतें. १९१६ सालीं कानपूरच्या व्याख्यानांत त्यांनी हें स्पष्ट केलें आहे. ते म्हणाले, "हिंदु समाजाला शास्त्रांतील चातुर्वर्ण्य मान्य आहे, पण तें आनुवंशिक नाही. गुण व कर्म यांच्या योगाने तें सिद्ध होते; पण इंग्रजांमुळे हें चातुर्वर्ण्यहि नष्ट झालें. कारण राज्यकर्त्यांनी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचीं कामें आपणाकडेच घेतली आहेत." वर उल्लेखिलेल्या करी-रोडच्या भाषणांत हा विचार त्यांनी आणखी स्पष्ट केला आहे. "आमच्या शास्त्रांत असें सांगितलें आहे की, ब्राह्मण असून तो वाईट कर्म करूं लागला तर तो शूद्र होतो, आणि शूद्र असून त्याने चांगले कर्म केलें तर शूद्राचा ब्राह्मण होतो." याच व्याख्यानांत त्यांनी कामगारांना सांगितले की, "इंग्लंडमध्ये 'लेबर पार्टी' म्हणून मजुरांचा पक्ष आहे. आज ना उद्या तेथे मजुरांचें राज्य होणार आहे. आणि येथील कामगारांनी प्रयत्न केला तर हिंदुस्थानांत त्यांचेंहि राज्य होईल." लो. टिळकांच्या राष्ट्रसंघटनेचें स्वरूप यावरून ध्यानीं येईल. येथली प्रत्येक व्यक्ति नागरिक झाली पाहिजे आणि कोणत्याहि क्षेत्रांतील अत्युच्च पदाचा मार्ग तिला मोकळा असला पाहिजे हा विचार त्या संघटनेत अत्यंत महत्त्वाचा होता. खरी सामाजिक सुधारणा ती हीच होय!
काँग्रेस, हिंदी स्वराज्य संघ यांसारख्या संस्थांत काम करतांना टिळकांनी अशीच वर्ण-जाति-धर्म-भेदातीत दृष्टि ठेवली होती. १९०८ साली धुळें येथे भरलेल्या प्रांतिक सभेत भाषण करतांना ते म्हणाले, "जात, मत व धर्म यांतील भेदाभेद लक्षांत न आणतां, सर्व माणसें राष्ट्राच्या कार्याकरितां एक होतात, याचें नांव एकी. याचें नांव राष्ट्र... राष्ट्र म्हणजे एका धर्माचे एका जातीचे, एका मताचे लोक अशी व्याख्या नाही. आपलीं भिन्न भिन्न मतें सोडून विशिष्ट उच्च हेतूकरिता लोक एक होतात, तेव्हा त्यास राष्ट्र म्हणतात... हिंदुस्थानचें कल्याण करण्याचा मक्ता एका जातीला, एका धर्माला, किंवा एका मताला (पक्षाला) दिलेला नाही. हें सर्वांचें काम आहे. देश-कल्याण करण्याचा सर्वांना हक्क आहे. या बाबतींत कोणी दुसऱ्यास कमअस्सल म्हणणें मूर्खपणाचें आहे." (व्याख्यानें, पृ. २२०)
राष्ट्रीय जीवन हें समूहजीवन आहे, हे संघटित जीवन आहे, हा त्यांच्या मनांतील भाव यांतून स्पष्ट होईल. त्यांच्या अहमदनगरच्या होमरूलवरील भाषणांत हाच भाव अनेक वेळा दिसून येतो. "मी तुम्हांला निश्चित सांगतों की, सर्व धर्मांच्या व सर्व जातींच्या लोकांनी एक होऊन सरकारकडे निश्चयाने ही मागणी केली, संघटितपणे तिचा पाठपुरावा केला, आणि ही मागणी मान्य झाल्यावांचून आम्ही