Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/३१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लो. टिळक व सामाजिक सुधारणा । २९७

न करतां सर्वांना सारखें द्यावें, असें टिळकांनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलें आहे. 'राष्ट्रीय शिक्षण' या विषयावरील व्याख्यानांत ते म्हणतात, "राष्ट्रीय शिक्षण हा विषय विशिष्ट जातीकरिता नाही. तो सर्व जातींचा सार्वजनिक विषय आहे. सर्वांना हा एकसारखाच परिचित असला पाहिजे... ही शाळा कोणत्याहि एका धर्माच्या लोकांकरिता नाही. एकट्या ब्राह्मणांकरिता नाही, किंवा एकट्या जैनांकरिता नाही. प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे निरनिराळें शिक्षण दिले जाईल, आणि बाकीचें शिक्षण एकसारखें दिलें जाईल. निरनिराळ्या पंथांतील द्वैतभाव काढून देशाकरिता काम करतां यावें असें शिक्षण दिले जाईल." (लो. टिळकांची व्याख्यानें, पृ. १६१, १६३). "सध्या केवळ अक्षरज्ञानासाठी कित्येक जाति आपापल्या जातीपुरत्या शाळा काढू लागल्या आहेत; पण राष्ट्रीय शिक्षणाच्या दृष्टीने जातिजातींच्या शाळा योग्य नव्हेत. सर्व जातींनी एकाच शाळेंत बसून, राष्ट्रोद्धाराचें शिक्षण घेणें अत्यंत इष्ट व आवश्यक आहे." (व्याख्यानें, पृ. ९६). "सर्व जातींनी एक होऊन सार्वजनिक कामें एकजुटीने करावीत असा बोध सभांमध्ये होत असतो. राष्ट्रीय शाळांमध्येहि जातिजमातींनी एक होण्याची आवश्यकता इत्यादि गोष्टी विद्यार्थ्यांस शिकविल्या पाहिजेत." (पृ. ९३).
मनोविकासाची संधि
 हें राष्ट्रीय शाळांमधून द्यावयाच्या शिक्षणाविषयी झालें. अन्यत्रहि राष्ट्रीय जीवनांत मनुष्याची जात, त्याचा वर्ण, धर्म हे कोठेहि आड येऊ नयेत, व्यक्तीचा मनोविकास व तिच्या सामर्थ्याचा विकास करण्याची संधि जाति-वर्ण-निरपेक्ष मिळाली पाहिजे, प्रत्येक क्षेत्रांत मिळाली पाहिजे, असें लोकमान्य कटाक्षाने सांगत असत. 'कामकरी लोक व दारूचें व्यसन' या विषयावर करी रोड, मुंबई येथे कामगारांपुढे भाषण करतांना ते म्हणाले, "तुम्ही मजूरलोक हलके आहां, खालच्या जातीचे आहा, अशी बुद्धि ठेवू नका. तुम्हा मजुरांत साधुसंत निर्माण झाले व त्यांच्या चरणी आम्ही ब्राह्मण लीन झालों होतों. त्यांनी ब्राह्मणांना देखील धर्माची दिशा दाखवून दिली आहे." (पृ. २७९). यावरून धर्मनिर्णय करण्याचा व धर्मप्रवचन करण्याचा कोणत्याहि जातीच्या मनुष्याला हक्क आहे, हें लोकमान्यांना मान्य होतें असें दिसतें. पुण्यास नाईकांच्या गणपतीपुढे झालेल्या व्याख्यानांत तसे त्यांनी स्पष्टंच म्हटले आहे. "सर्व जातींच्या शहाण्या लोकांनी धर्माचा विचार करून, सलोखा वाढविण्यासारखें, व धर्माची घडी बसेल असें कांही करण्याकरिता, एक कौन्सिल नेमलें पाहिजे व त्यांचें मत शंकराचार्यांनी घेतले पाहिजे." (पृ. ३०), याच व्याख्यानांत गादीसंबंधी तंटे करणाऱ्या शंकराचार्यांवर कडक टीका करून त्यांनी लोकांना सांगितलें आहे की, "लोकांनी आपला हक्क गुरूस दाखविला पाहिजे, नाही तर गुरुत्व दुसऱ्यास दिले पाहिजे."