२९६ । केसरीची त्रिमूर्ति
येईल. राष्ट्रीय शिक्षणाची त्यांनी अनेक ठिकाणीं व्याख्या दिली आहे व स्वरूप वर्णिलें आहे. प्रत्येक व्यक्तीस राष्ट्राची जबाबदारी आपल्यावर आहे व सर्व व्यक्तींनी संघटित होऊन ती पार पाडली पाहिजे, ही शिकवण देतें तें, टिळकांच्या मतें, राष्ट्रीय शिक्षण होय. सोलापूरच्या एका व्याख्यानांत ते म्हणतात, "आपण कोण, आपली स्थिति काय, देशाची कामगिरी काय याची ओळख करून देणारें तें राष्ट्रीय शिक्षण होय." (व्याख्यानें, पृ. १५६). अनेक व्याख्यानांतून ही कल्पना त्यांनी विशद केली आहे. "राष्ट्रीय गुणांचे शिक्षण देणारें तें राष्ट्रीय शिक्षण.", "लोकांत राष्ट्रीयत्वाची कल्पना आणा. ती आणील तें राष्ट्रीय शिक्षण.", "हिंदुस्थानचा भाग्योदय कशाने होईल, सध्या तो का होत नाही, याची विद्यार्थ्यांना कल्पना दिली पाहिजे.", "आपला धर्म कळावा, देश कळावा, नीतीचें आचरण घडावें, देश खाली जात चाललेला वर उचलण्याची ताकद व धैर्य यावें, जोम यावा यांकरिता राष्ट्रीय शाळा पाहिजे आहेत.", "प्रत्येक मनुष्यास आपली स्थिति किती वाईट झाली आहे हें ज्या शाळेत समजाविलें जाईल ती राष्ट्रीय शाळा.", "आम्हांस राष्ट्रीय शिक्षण कशाला हवें? फिरोजशहा मेथा, रानडे यांच्यासारखे लोक सतत व जास्त निपजत राहवे यासाठी.", "राष्ट्राकरिता मी वेळ आल्यास मरेन देखील, अशी बुद्धि उत्पन्न होईल असें शिक्षण राष्ट्रीय शाळेत दिलें पाहिजे.", "देशाकरिता मरावयास तयार झाला तोच खरा देशभक्त.", "ज्याला इंग्रजीत कॅरॅक्टर म्हणतात तें चारित्र्य,- दानत- राष्ट्रांतील लोकांत असली पाहिजे. त्यांच्यांत करारीपणा असला पाहिजे, आणि मी राष्ट्राकरिता मरण्यास देखील तयार आहे अशी बुद्धि राष्ट्रांतील तरुणांत उत्पन्न झाली पाहिजे. हें ज्या शिक्षणाने होईल तें राष्ट्रीय शिक्षण.", "राष्ट्रीय शिक्षण द्यावयाचें तें एवढयाचकरिता की, मुलांच्या मनांत राष्ट्राशिवाय प्रथम दुसरी कोणतीहि गोष्ट येऊ नये.", "राष्ट्रीय शिक्षण स्वदेशी- बहिष्कारापेक्षाहि जास्त योग्यतेचें आहे. राष्ट्राचें मन बदलणें, राष्ट्रांतील लोकांत भावना उत्पन्न करणें, हें राष्ट्रीय शिक्षणाचें काम आहे.", "ज्या स्वातंत्र्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत त्या स्वातंत्र्याची ओळख काय सरकारी शिक्षण करून देणार? राष्ट्रीय शिक्षणाची आवश्यकता ही ओळख पटवून देण्यासाठी आहे.", "राष्ट्राला धक्का बसला असतां आपल्याला धक्का बसल्यासारखें वाटणें, आपलीं लहानसान कामे बाजूला ठेवून राष्ट्राच्या कामाला जाणें, राष्ट्राचा खेद स्वतःच्या खेदास कारण होणें किंवा राष्ट्राचा त्वेष आपल्या अंगी उत्पन्न होणें हें (सध्या आपल्यांत) कमी आहे व तें (राष्ट्रीय शिक्षणाने) आले पाहिजे." (सर्व अवतरणें- कै. लोकमान्य टिळक यांची व्याख्याने, प्रकाशक, केसरी-मराठा संस्था, पुणें).
जातिवर्णनिरपेक्ष
प्रत्येक व्यक्तीला राष्ट्रकार्याची शिकवण देणारें व तें कार्य करण्यास तिला समर्थ करणारें असें हें राष्ट्रीय शिक्षण वर्ण, जाति, धर्म, पंथ यांचा कसलाही विचार