Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/३००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

टिळकांचें राष्ट्रीय अर्थशास्त्र । २८५

त्याला तें संचित धन विनाकष्ट प्राप्त करून देणें, हा समाजावर अन्याय आहे. दत्तकाचा प्रघात पडल्याने आज लाखो रुपये लोकोपयोगाकडे न लागतां, श्रम केल्या वांचून कांही लोक त्यांचा यथेच्छ उपभोग घेत आहेत. यांत समाजाचें फार नुकसान आहे. सारांश, अर्थशास्त्रदृष्ट्या पाहिलें, तर स्वार्जित धनावर मनुष्याला पूर्ण हक्क दिल्यामुळे समाजांत जी आर्थिक विषमता निर्माण होते, ती मोडून टाकण्याची संधि या दत्तकाच्या रूढीमुळे नाहीशी होते. (पृ. ६६, ७०).
समाजवादी अर्थशास्त्र
 दत्तकाविषयी यापुढे आणखी कांही विवेचन टिळकांनी केले आहे. पण आपल्या विषयाच्या दृष्टीने तें अप्रस्तुत आहे. आपल्याला लक्षणीय आहेत तीं त्यांची संपत्तीच्या विभजनासंबंधीचीं मतें. मनुष्य धनसंचय करूं शकतो, तो समाजाच्या मदतीमुळे. म्हणून त्याच्या संचयावर समाजाचा बराच हक्क असतो. आता त्याची उद्योग- प्रेरणा नष्ट होऊं नये म्हणून त्याचें स्वामित्व समाज मान्य करतो व अर्जित धन पुत्रांना ठेवण्याचा त्याचा हक्कहि युक्त मानतो; पण या मर्यादा संपल्यावर त्या धनाचा वाटेल तो उपयोग करण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे, असें मात्र नाही. हें व्यावहारिक अर्थशास्त्र झाले; पण आदर्श व्यवस्था कोणती म्हणून विचार करतां, व्यक्तिमात्रास सारखें काम व सारखें सुख असलें पाहिजे; आणि यासाठी सर्वांना सारखें धन वांटून दिले पाहिजे- ही उत्कृष्टावस्था होय, असें लो. टिळकांचें उत्तर आहे.
 केसरीच्या दुसऱ्या- तिसऱ्या वर्षांत, 'समाइकीने उभारलेल्या भांडवलाचे कारखाने' या विषयावर दोन लेख आले आहेत. त्यांत गिरण्या- कारखान्यांच्या भांडवलांत कामगारांचेहि भाग असावे, त्याचे पैसे त्यांच्याकडून सवलतीने घ्यावे, त्यांना शक्य नसेल तर प्रथम त्यांच्या भागाचे पैसे उत्पादकांनी घालावे व मग ते हळूहळू वसूल करून घ्यावे, असें सांगितलें आहे. यांत हेतु असा की, "कामगारांचा कारखान्याच्या नफ्यांत वांटा असला पाहिजे." या रीतीने मेहनतीबद्दल रोजमुरा मिळून नफ्यापैकी कांही भाग सालअखेरीस मिळण्याची खात्री झाल्यामुळे कारखान्याचा नफा करण्याकडे सर्व लोकांचा एकदिल लागतो. आणि या व्यवस्थेने कष्टकरी जनतेची स्थिति सुधारते. आणि या समाजाची स्थिति सुधारल्याखेरीज देशस्थिति सुधारली असें कधीहि म्हणतां येणार नाही. (पुस्तक २ रें, पृ. ४६ ते ४९).
 लो. टिळकांचे अर्थशास्त्रीय सिद्धान्त काय होते हें वरील विवेचनावरून ध्यानांत येईल. त्यांच्या राजनीतीचा किंवा अर्थकारणाचा विचार करतांना हे त्यांचे सिद्धान्त कधीहि दृष्टीआड होऊं देता कामा नये. येथे जें विवेचन आता करावयाचें आहे तें त्यांचीं ही तत्त्वें मनांत वागवूनच करावयाचें आहे.
कारखानदारीची वाढ
 या देशाचें दारिद्र्य नष्ट व्हावयाचें तर येथे भांडवली पद्धतीची कारखानदारी अत्यंत वेगाने प्रगत झाली पाहिजे, येथला व्यापार वाढला पाहिजे; आणि येथली