Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२८४ । केसरीची त्रिमूर्ति

वेळी मनुष्य धनसंचय करूं शकतो. या वेळीं समाज राजसत्ता स्थापून, अनेक कायदे करून, आणि सैन्य व पोलिस दलें उभारून समाजाचें, त्यांतील कुटुंबांचें, त्यांतील मनुष्यांचे, त्यांच्या घरादारांचें, जमिनीचें, पशुधनाचें एकंदर जीवित-वित्ताचें रक्षण करतो; आणि मनुष्याला धनसंचय करून त्याचें रक्षण करणें हें समाजाने केलेल्या या व्यवस्थेमुळेच शक्य होतें.
धनावरील हक्क?
 आता धनाचें अर्जन आणि संचित धनाचें रक्षण हें जर समाजामुळे शक्य होतें तर त्या संचित धनावर समाजाचा कांही प्रमाणांत तरी हक्क असला पाहिजे हें उघड आहे. द्रव्यसंचय होतो, तो समाजाच्या मदतीने होतो. तेव्हा त्या द्रव्याचा व्यय योग्य रीतीने कसा करावा हें समाजाने सांगावें व लोकांनी तें पाळावें हें न्यायता प्राप्त होतें; आणि हा न्याय मान्य केला तर अर्थशास्त्रदृष्ट्या प्रत्येक मनुष्याचा आपल्या स्वकष्टार्जित द्रव्यावरहि फारच कमी हक्क आहे असें दिसेल. 'वसुधैव कुटुंबकम्' या उदार दृष्टीने पाहतां समाजाची अति उत्कर्षावस्था म्हटली म्हणजे व्यक्तिमात्रास सारखें काम व सारखें सुख असावें, ही होय. व असें होण्यास सुखप्राप्तीचें साधन जें द्रव्य तें समाजांत एकतर सारखें वांटून गेलें पाहिजे किंवा एकत्र असल्यास समाजाच्या सामायिक ताब्यांत असलें पाहिजे. एरव्ही सर्वांस सारखें सुख कधी प्राप्त होणार नाही. (केसरीतील निवडक निबंध, पुस्तक १ लें, पृ. ६३, ६४).
 पण ही अति उत्कर्षावस्था म्हणजे आदर्श ध्येयवादी अवस्था झाली. सर्व- समाजहितांतच आपले हित आहे, ही वृत्ति प्रत्येक मनुष्याची होईल तेव्हा ती शक्य आहे; पण मनुष्यस्वभाव असा नसतो. मी व माझें यापलीकडे तो पाहत नाही. म्हणूनच प्रत्येक मनुष्याने स्वकष्टाने मिळविलेल्या धनावर त्याचें संपूर्ण स्वामित्व समाजाने मान्य केलें आहे. तसें केल्यावांचून मनुष्याला उद्योगाला, कष्टाला प्रेरणाच मिळणार नाही. याच कारणामुळे मनुष्याने स्वकष्टार्जित सर्व धन आपल्या पुत्रांना, आप्तांना द्यावें हा त्याचा हक्कहि समाजाने मान्य केला आहे. पुत्र-कन्या यांच्या प्रेमामुळेच मनुष्य कष्ट करण्यास प्रवृत्त होतो व मिळविलेल्या द्रव्याचा संचय करण्याची त्यास बुद्धि होते.
समाजाला वांटा द्या
 पण मनुष्याचा स्वार्जित धनावर असा पूर्ण हक्क मान्य केल्यामुळेच समाजांत विषमता निर्माण होते. कांही लोक अति श्रीमंत होतात व कांहींना दिवसभर कष्ट करूनहि पोटास मिळत नाही. ही स्थिति समाजाच्या दृष्टीने श्रेयस्कर नाही. म्हणून स्वार्जित धनाचा वांटा समाजाला मिळवून देण्याचे अनेक मार्ग आपण अवलंबिले पाहिजेत.
 दत्तकाची रूढि नष्ट करणें हा तसाच एक मार्ग आहे. पुत्रांना मनुष्याने धन ठेवणें हें युक्त आहे. पण पुत्र नसतांना कोणा तरी सोम्यागोम्याला दत्तक घेऊन,