Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

टिळकांचें राष्ट्रीय अर्थशास्त्र । २८३

कामगारांच्या कामाचे तास कमी झाले पाहिजेत, असा आग्रह धरीत; आणि हें सर्व हिंदी जनतेला माल स्वस्त मिळावा व कामगारांचे हाल वांचावे म्हणून आम्ही करीत आहों, असें सांगत. टिळकांनी याच संदर्भात त्यांच्यावर मार्जार-साधु, बकध्यानी अशी टीका केली, हें मागे सांगितलेंच आहे; पण यामुळेच ते भांडवलदारांचे पक्षपाती आहेत, कामगारांच्या हिताची त्यांना चिंता नाही, असा त्यांच्यावर आक्षेप आला होता. सावकार, खोत, जमीनदार यांच्या बाबतींतहि असेंच झालें. सावकार हे शेतकऱ्यांना नागवितात, लुबाडतात, त्यामुळे शेतकरी दरिद्री झाला आहे असा प्रचार ब्रिटिश सरकार अखंड करीत राहिलें होतें. त्यावरहि टिळकांनी वेळोवेळी कडक टीका केली. त्यामुळे ते सावकार, जमीनदार यांचा शेतकऱ्यांविरुद्ध पक्ष घेतात असाहि त्यांच्यावर आक्षेप येत असे. अजूनहि येतो. यासाठीच टिळकांच्या अर्थशास्त्रीय तत्त्वांचा परिचय करून घेऊन वरील प्रकारच्या आक्षेपांत कितपत तथ्य आहे, हें पाहणें अवश्य आहे
 'दत्तकाची आवश्यकता' या विषयावर केसरीच्या तिसऱ्या व चौथ्या वर्षाच्या अंकांमिळून एकंदर आठ लेख टिळकांनी लिहिले आहेत. (केसरीतील निवडक निबंध, पहिलें पुस्तक, पृ. ४८-७४). त्यांत अत्यंत मूलगामी असे अर्थशास्त्रीय विचार त्यांनी सांगितलेले आहेत.
दत्तक अनावश्यक
 टिळकांच्या मतें दत्तक घेण्याची आवश्यकता मुळीच नाही. त्या रूढीमुळे समाजाचें फार नुकसान होत आहे. आज रूढ असलेलें दत्तकपुत्राचें सर्व शास्त्र स्मृतींनी सांगितलें आहे. वेदकाळीं तसें शास्त्र नव्हतें. मेल्यानंतर स्वर्गप्राप्ति व्हावी व आपल्यामागे आपलें नांव चालावें ह्या दोन हेतूंनी मनुष्य दत्तक घेतो. जुन्या धर्मशास्त्रानेहि याच हेतूंनी दत्तकाची आवश्यकता सांगितली आहे; पण त्याच धर्मशास्त्राचें सविस्तर विवेचन करून टिळकांनी असे दाखवून दिलें आहे की, हे दोन्ही हेतु साध्य होण्यासाठी त्या जुन्या धर्मशास्त्रानेच इतर अनेक मार्ग सांगितले आहेत. तेव्हा दत्तक घेण्याची आजच्या समाजांत तर मुळीच जरूर नाही.
 हा धर्मशास्त्रीय विचार प्रथम सांगून मग अर्थशास्त्राच्या दृष्टीने दत्तकाची रूढि कशी अनिष्ट व समाजाला अहितकारक आहे तें सांगितलें आहे. तें सांगतांना आजचे सर्व समाजवादी विचार टिळकांनी त्या लेखांत मांडलेले आहेत; आणि पुढे व्यवहारदृष्ट्याहि त्यांची युक्तायुक्तता तपासली आहे. टिळकांचें प्रतिपादन असें आहे:-
 अगदी प्राथमिक अवस्थेत समाज भटक्या स्थितींत असतो. शेतीची त्याला माहिती नसते. कंदमुळांवर तो निर्वाह करीत असतो. अशा स्थितींत कोणत्याहि प्रकारचा धनसंचय करणें त्याला शक्य नसतें. पुढे शेती, पशुपालन, कारागिरी यांची माहिती झाल्यावर समाज स्थिर होतो, कुटुंबसंस्था दृढमूल होते; आणि मग त्या